(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : कडाक्याच्या थंडीचा 'पेरु'वर परिणाम, रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट, शेतकरी अडचणीत
Agriculture News : थंडीचा शेती पिकांवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळं पेरु बागांचं (Guava Crop) मोठं नुकसान झालं आहे.
Agriculture News in Nanded : सध्या वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. काही ठिकाणी थंडीचा कडाका (Cold Weather) तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. काडाक्याची थंडी सुरु असल्यानं अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, या थंडीचा शेती पिकांवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका आणि आता कडाक्याच्या थंडीमुळं पेरु बागांचं (Guava Crop) मोठं नुकसान झालं आहे.
नांदेड जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. कारण सुरुवातीला अवकाळी आणि अतिवृष्टीच्या फटक्याने सोयबीन, उडीद, मूग, तूर, कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं उत्पादनात मोठी घट होऊन शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. अगोदरच सोयाबीन, उडीद, मूग, कापूस ही पिके हातची गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात परतीच्या पावसानं आणि थंडीच्या तडाख्याने आता फळबागांचे मोठे नुकसान होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
गट शेतीतून शेकडो हेक्टरवर पेरू पिकाची लागवड
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टलसह परिसरातील शेतकऱ्यांनी पोखरा अंतर्गत गट शेतीतून जवळपास शेकडो हेक्टरवर मोठ्या प्रमाणात पेरू पिकाची लागवड केली आहे. यामध्ये व्ही .एन. आर या पेरू फळाची लागवड करून एक वर्षात या पेरू फळझाडांना फळ येण्यास सुरुवात होते. एकरी 500 ते 550 एवढी पेरूच्या झाडांची लागवड केली जाते. ज्यात दरवर्षी एकरी एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न होते. परिणामी यावर्षी परतीच्या पावसाच्या तडाख्याने आणि कडाक्याच्या थंडीमुळं पेरू बागांवर रोगराई आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट झाली आहे.
थंडीमुळे पेरु फळांची वाढ खुंटल्यानं उत्पादनावर मोठा परिणाम
परतीच्या पावसामुळं पेरूच्या फुलांची गळती झाली होती. थंडीमुळे पेरु फळांची वाढ खुंटल्यानं उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. तर थंडीच्या तडाख्यानं पेरू फळावर बुरशी आणि फळमाशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पेरू फळावरील रोगराईमुळं पेरू बागा वाळायला लागल्या आहेत. परतीचा पाऊस आणि थंडीच्या तडाख्याने शेतकरी संकटात सापडला आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: