(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आई अण्णा मला माफ करा, मराठा आरक्षणासाठी नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
Nanded : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या कोमलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहे. फक्त एक एकर शेती आहे.
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात सोमेश्वर गावातील 9 वीत विध्यार्थीने आत्महत्या केली आहे. कोमल तुकाराम बोकारे असे तरुणीचे नाव आहे. इयत्ता 9 शिकणाऱ्या कोमल हिने स्वतःचा घरात चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावे, माझा बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा, असे कोमलने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. नांदेड जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी ही पाचवी आत्महत्या आहे.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या कोमलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहे. फक्त एक एकर शेती आहे. घरात एकुण पाच मुली आहे. दरम्यान, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोमलचे वडील करत आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोमलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने बोकारे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
सुसाईड नोट सापडली...
कोमलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ज्यात तिने म्हटले आहे की, “मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावं,माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा...”
मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले. असे असतानाच मराठा आरक्षणासाठी अनेक ठिकाणी आत्महत्या सारख्या घटना समोर येत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचे समोर येत आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पाच आत्महत्या झाल्या आहेत.
हिंगोलीत विजेच्या ताराला स्पर्श करत आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्यांचा सत्र सुरूच आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील एकामागून एक आत्महत्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होतांना पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा येथील 27 वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी विजेच्या ताराला स्पर्श करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. आदित्य राखोंडे असं मयत युवकाचे नाव होते. आदित्य हा उच्चशिक्षित होता. मात्र, असे असतांना नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. याच चिंतेत त्याने सुसाईड नोट लिहून आपली जीवन यात्रा संपवली. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी सुरु असेललं आत्महत्या सत्र चिंतेचा विषय बनला आहे. तर, दुसरीकडे तरुणांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहन सरकार आणि मनोज जरांगे यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: