(Source: ECI/ABP News/ABP Majha)
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना 'राज्य अतिथी'चा दर्जा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Wardha Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: वर्ध्यात होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्धाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : समाजाला भेडसावणारे मुद्दे, त्याविषयी वाटणारी तळमळ आणि सामाजिक जाणीव यातून एक उत्तम आणि जबाबदार साहित्यक जन्मला येतो अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने वर्धा (Wardha) येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याशिवाय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना 'राज्य अतिथी'चा दर्जा देण्याचे निवेदन मान्य केल्याची घोषणा त्यांनी केली. स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी साहित्य नगरी सजली आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शासन कायम साहित्यिक मंडळींच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी अनेक विकास कामे होत आहे. अशा विकास कामांचा उल्लेख देखील साहित्यकांनी आपल्या रचनांमध्ये करावा असे ते म्हणाले. याशिवाय ग्रामीण भाषा, बोली भाषा संवर्धनासाठी शासन प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील थोरामोठांच्या यशोगाथा अधिक व्यापक स्वरूपात पुढे आणता येतील का, चांगल्या परदेशी साहित्याचा अनुवाद केल्या जाऊ शकेल का अशा मुद्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.
संमेलनाचे अध्यक्ष न्या, चपळगावकर यांनी थोडक्यात व्यक्त केलेल्या मनोगतात विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. नुकत्याच शासन आयोजित साहित्य संमेलनाबाबत बोलताना त्यांनी असे आयोजन स्वायत्त संसथा यांच्या मार्फत व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुरवातीला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांनी मनोगत व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतींना उजाळा देऊन साहित्य परंपरा जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे यांनी साहित्य संमेलन सर्वार्थाने फलद्रुप व्हावे अशी आशा व्यक्त केली आणि या संमेलनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि साहित्य प्रेमींचे स्वागत केले. यावेळी त्यांनी वर्धा आणि साहित्ययिक परंपरा याबद्दल विविध आठवणींना उजाळा दिला.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाला राज्याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्याक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, खासदार, जिल्ह्यातील आमदार,तसेच आमदार डॉ. विश्वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची उपस्थिती होती.
समाजाला पुन्हा पुन्हा महात्मा गांधींच्या विचाराकडे यावे लागेल
त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी वर्ध्याच्या साहित्य संमेलनाचे विशेष महत्व विशद केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजन , नियोजनासाठी 2 कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मावळते अध्यक्ष सासणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की समाजाला पुन्हा पुन्हा महात्मा गांधींच्या विचाराकडे यावे लागेल. गांधींचे विचार हे कायमच दिशा दर्शक असल्याचे ते म्हणाले. त्यापूर्वी त्यांच्या कार्यकाळातील कार्यांचा त्यांनी आढावा घेतला आणि त्यांनी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.
सूत्र प्रदान सोहळा
मावळते अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत ससाणे यांनी अध्यक्षपदाची सूत्र विद्यमान अध्यक्ष न्या. चपळगावकर यांना दिली. यानंतर विदर्भ साहित्य संघ शताब्दी विशेष अंक 'दौत लेखणी ' चे विमोचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते झाले.
ही बातमी देखील वाचा...