Sharad Pawar : तरुणांनी मांडलेल्या प्रश्नाची दखल घेतली नाही तर ते आपली शक्ती दाखवल्याशिवाय राहणार नाहीत; शरद पवारांचा इशारा
Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra : युवकांच्या प्रश्नाची दखल सरकारने घ्यावी, मराठा आणि धनगर आरक्षणाबद्दल तरूणांच्या अपेक्षा वाढल्या आहेत असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
नागपूर: रोहित पवारांनी युवा वर्गाला घेऊन त्यांच्या समस्या सरकारसमोर मांडल्या, त्यासाठी त्यांनी युवा संघर्ष यात्रा (Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra ) काढली, आता तरुणांच्या प्रश्नांची दखल जर सरकारने घेतला नाही तर ते युवावर्ग आपली शक्ती दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तसेच मराठा आणि धनगर आरक्षणाबद्दल तरूणांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे त्यांची दखल सरकारने घ्यावी असंही ते म्हणाले. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात समारोप झाला. त्यानिमित्ताने आज त्या ठिकाणी शरद पवारांनी जाहीर सभेला संबोधित केलं.
शरद पवार म्हणाले की, "रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढली, त्या दरम्यान त्यांनी दोन लाख लोकांशी थेट संपर्क साधला. 10 जिल्ह्यातून 32 दिवसांच्या या प्रवासात त्यांनी सर्वसामान्यांशी संवाद साधला आणि त्यांनी या यात्रेचा शेवट केला. आता त्यांच्या मागण्यांची दखल राज्य सरकारने घेणं गरजेचं आहे."
काय म्हणाले रोहित पवार?
ही यात्रा म्हणजे शक्तिप्रदर्शन नाही. आम्ही लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ही यात्रा काढली. सरकार कोणाचंही असो, शेतकरी, तरुण, सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. आज आम्ही जनतेच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयात दिले आहे. मला इथे उपस्थित लोकांना विचारायचे आहे, सरकार आपल्या मागण्यांकडे लक्ष देणार नसणार तर तुम्ही सर्व आमच्या सोबत विधिमंडळात चालणार का? दिल्ली समोर कधी महाराष्ट्र झुकला नाही. स्वाभिमानासाठी जे बोलतील त्यांनाच येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे. सभेनंतर सरकारकडून आपल्या मागण्यांची दखल घेण्यासाठी कोणी आले नाही, तर आपण सगळ्यांना विधिमंडळ कडे जायचे आहे.
युवा संघर्ष यात्रा ही 24 ऑक्टोबरला पुणे येथून सुरू झाली. या यात्रेने 10 जिल्हे, 30 तालुके आणि सुमारे 800 किलोमीटरचे अंतर पार केले आहे. तरुणांचे विविध मुद्दे घेऊन निघालेली रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रेचा समारोप होत असताना त्यांचे आजोबा शरद पवार वाढदिवस असताना ही उपस्थित राहिले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार यांची ही यात्रा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे एका प्रकारे नव्याने लौंचिंग मानलं जात आहे.
कुणालाही मतं दिली तरी ते भाजपकडे जातात
महाराष्ट्राचा उमलते नेतृत्व म्हणजे रोहित पवार यांचा मला अभिमान वाटतो असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. ते म्हणाले की, लढण्याची धमक असलेल्या तरुणांना प्रेरणा देणारे शरद पवार. आधी म्हणायचे बटन कुठले ही दाबले तरी मत भाजपला जाते. आता म्हणतात की निवडून कोणालाही दिले तर ते भाजपकडे जातात. आधी हिंदुत्वाच्या नावावर एक पक्ष फोडला आणि नंतर विकासाच्या नावावर आता दुसरा पक्ष फोडला. कांद्याचे, दुधाचे दर पडले. असा कसला विकास? दिल्लीतून डफली वाजली तरी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून मान हालते. मात्र, महाराष्ट्राचे अहित होत असताना अशीच मान हलवत राहणार का?
ही बातमी वाचा: