Samriddhi Highway: समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; डिझेल अभावी पोलीस गस्त गेल्या 15 दिवसांपासून बंद
समृद्धी महामार्गावर गस्त घालणारे पोलीस पथक डिझेलअभावी गेल्या 15 दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गाची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे चित्र आहे.
Samriddhi Highway : महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेल्या समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) वाहतुकीसाठी सुरू झाल्या पासून कायम चर्चेत राहिला आहे तो त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे. (Samruddhi Highway Accident) मात्र आता हाच समृद्धी महामार्ग पुन्हा चर्चेत आला आहे तो या महामार्गाच्या सुरक्षा यंत्रणेच्या कारणामुळे. कारण समृद्धी महामार्गावर गस्त घालणारे पोलीस पथक (Police Patrolling) डिझेल अभावी गेल्या 15 दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावर अनावधानाने कुठला अपघात अथवा कुठली आपातकालीन परिस्तिथी निर्माण झाल्यास मदत पुरविणाऱ्या पोलिसांच्या (Police)वाहनाला डिझेल पुरवठा होत नसल्याने पोलिसांची वाहने गेल्या 15 दिवसांपासून जागेवरच उभी असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना नाईलाजाने समृद्धी महामार्गावर कुठला अपघात झाल्यास एमएसआरडीसीच्या रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागतो आहे.
डिझेल अभावी पोलीस गस्त गेल्या 15 दिवसांपासून बंद
समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेसाठी आणि विहित वेग मर्यादा पाळले जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने 27 नोव्हेंबर 2023 रोजी समृद्धी महामार्ग पोलीस सुरक्षा विभागाला पंधरा वाहने दिली होती. मात्र आता ही वाहने डिझेल अभावी जागेवरच थांबलेली असल्याने समृद्धी महामार्गाची सुरक्षा धोक्यात आली आहे. अनेक डिझेल पुरवठा धारकांचे देयके थांबल्यामुळे डिझेल पुरवठादार या वाहनांना डिझेल देत नसल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे. डिझेल अभावी पोलिसांची ही वाहने आता जागेवरच असल्याने समृद्धी महामार्गावरील गस्त ही गेल्या पंधरा दिवसापासून बंद आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गाची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे चित्र आहे.
समृद्धी महामार्गाची सुरक्षा रामभरोसे
समृद्धी महामार्गावर दिवसाला हजारोंच्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे अनेक अपघातांच्या घटना देखील घडत असतात. अशावेळी वेळीच मदत मिळणे ही अतिशय महत्वाचे ठरत असते. शिवाय मधल्या काळात समृद्धी महामार्गावर काही लूटपाट झाल्याच्या देखील घटना घडल्याचे देखील बोलले जात होते. सोबतच या महामार्गावरून काही दिवसांपूर्वीच गो तस्करीचे प्रकरण देखील समोर आले होते. अशा कितीतरी प्रकरणांवर कारवाई आणि तत्काळ मदतीसाठी पोलिसांची महत्वाची भूमिका ठरत असते. मात्र वाहनांना डिजेल उपलब्ध होत नसल्याने आता समृद्धी महामार्गाची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Amravati News : क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या तरूणांवर काळाचा घाला; चार जणांचा जागीच मृत्यू, 10 गंभीर
बुलढाणा अपघातातील पीडित कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा, मृतांच्या नातेवाईकांना मदत न मिळाल्यानं आंदोलन