(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांचा ताफा जाईपर्यंत नागपुरातील वाहतूक थांबवणार; फौजफाटा तैनात, वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील त्या-त्या ठिकाणची वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली जाणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
Nagpur News : आज समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg), नागपूर मेट्रो, नागपूर-बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेससह (Vande Bharat Express) विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण, उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या निमित्तानं संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मोदींचा ताफा नागपूर विमानतळावरुन (Nagpur Airport) रेल्वेस्थानकाकडे पोहोचेपर्यंत यामार्गावरील वाहतूक थांबवली जाणार आहे. पंतप्रधानांच्या वाहानांचा ताफा निघून गेल्यानंतर वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीत केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्या दरम्यान शहरातील वाहतूक विस्कळीत होणार नाही याचं नियोजनही सुरक्षा यंत्रणा आणि वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे. आज पंतप्रधानांचा ताफा विमानतळाकडून रेल्वेस्थानकाकडे जाताना उड्डाणपुलावरुन त्यांचा ताफा जाणार आहे. यावेळी उड्डाणपुलाखालील वाहतूक सुरळीत सुरु राहणार आहे. तर उड्डाणपुलावरुन पंतप्रधानांचा ताफा खाली उतरल्यानंतर अजनी चौकातून तो रेल्वेस्थानकाकडे जात असताना तेथील वाहतूक काही वेळासाठी रोखली जाणार आहे. त्यानंतर मॉरिस कॉलेज टी पॉइंट येथेही वाहतूक थांबवण्यात येणार आहे.
पंतप्रधानांचा ताफा रेल्वेस्थानकाकडे (Nagpur Railway Station) निघून गेल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत होणार आहे. थोडक्यात, पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना, त्या-त्या ठिकाणची वाहतूक काही वेळेसाठी बंद राहणार आहे. नागरिकांना याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचं शहर पोलिसांकडून सागंण्यात आलं आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळं नागपुरातील 'हे' मार्ग बंद राहणार
• रेल्वेस्टेशन परिसरातील मुख्यद्वार सामान्य प्रवाशांसाठी सकाळी 7.30 ते 11 वाजतापर्यंत बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील नागरिकांना पूर्वेकडील द्वारातून (संत्रामार्केट) प्रवेश घ्यावा लागणार आहे.
• आरबीआय ते एलआयसी मार्ग बंद
• सदर ते जयस्तंभ चौकापर्यंतचा रस्ता बंद करण्यात येईल.
• रामझुल्यावरील रहदारीही या काळात बंद करण्यात येणार आहे.
• लोहापूल ते मानस चौकांपर्यतची वाहतूक बंद करण्यात येईल.
• वर्धामार्गावरील पंतप्रधानांच्या ताफ्याच्या वाहतुकीदरम्यान उड्डाणपूलही यावेळी बंद करण्यात येईल.
सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट' मोडवर
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. पंतप्रधानांच्या मार्गासह त्यांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी असलेल्या बंदोबस्ताचाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आढावा घेतला. नियोजित दौऱ्यानुसार, पंतप्रधान प्रथम सीताबर्डी (Sitabuldi) येथील रेल्वे स्टेशनवर 'वंदे भारत' रेल्वेसेवेची सुरुवात करणार आहेत. यानंतर ते मेट्रोनं खापरी आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाकडे प्रस्थान करतील. यादरम्यान संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी दिल्लीहून एसपीजी SPG (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) शहरात दाखल झाले आहेत. तसेच शहरातील सर्व पोलीस (Nagpur Police) उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षकांसह, क्युआरटी, वाहतूक पोलीस आणि सर्व पथक असे एकूण साडेतीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तात समावेश आहे. याशिवाय शहराबाहेरील एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 पोलिस उपायुक्त, 25 सहायक पोलीस आयुक्त, फोर्स वन Force One आणि राज्य राखीव दलाच्या तीन कंपनी मागविण्यात आलेल्या आहेत. वाहतूक विभागाची जबाबदारी अतिशय महत्त्वपूर्ण राहणार असून त्यासाठी वाहतूक विभागातील 1500 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या भेटीच्या ठिकाणाच्या वेळी विशिष्ठ ठिकाणांची वाहतूकही वळविण्यात येणार आहे.
ही बातमी देखील वाचा