Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
केवळ घोषणा केल्या जात आहेत, असा आरोप सतेज पाटील करत असतील तर प्रत्यक्ष सुरू असलेली कामे कंत्राटदार पैसे मिळण्याआधी करतील का, असा थेट सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे.

Rajesh Kshirsagar on Satej Patil: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून शिवसेना (शिंदे गट) आमदार राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केवळ घोषणा केल्या जात आहेत, असा आरोप सतेज पाटील करत असतील तर प्रत्यक्ष सुरू असलेली कामे कंत्राटदार पैसे मिळण्याआधी करतील का, असा थेट सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे. “विकासकामे ही कागदावरची नसून प्रत्यक्षात सुरू आहेत. त्यामुळे चुकीच्या नेरिटीव्हवर पुन्हा एकदा जनता फसणार नाही,” असा टोला त्यांनी लगावला. विधानसभेप्रमाणेच आता महापालिकेतही कोल्हापूरकर जनता घंटी वाजवून आपला कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिकेची हद्दवाढ कोणत्याही क्षणी होऊ शकते
गेल्या महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणे ही आमची चूक होती, असे मान्य करताना, त्या काळातही आम्हाला फारसा अधिकार देण्यात आला नव्हता, असा आरोप क्षीरसागर यांनी केला. परिवहन सभापतीपद मिळाल्यानंतर मात्र आम्ही शेकडो कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून दाखवले, हे त्यांनी ठळकपणे अधोरेखित केले. आगामी काळात कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ कोणत्याही क्षणी होऊ शकते, याकडे लक्ष वेधत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत संपूर्ण राज्याला माहिती असल्याचे ते म्हणाले.
त्यामुळे माझ्यावर टीका करत असावेत
दरम्यान, सतेज पाटील यांनी काल (3 जानेवारी) पंचनामा प्रसिद्ध करताना राजेश क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले की, आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना आम्ही सुद्धा केलेल्या कामांची यादी लोकांसमोर ठेवणार आहोत. मात्र, गेल्या तीन वर्षापासून महायुतीची सत्ता होती. त्यांनी जो काही कारभार केला आहे त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. आमची महापालिका मध्ये सत्ता होती त्यावेळी हसन मुश्रीफ सोबत होते. राष्ट्रवादीचा महापौर दोन वर्ष होता. परिवहन सभापतीपद त्यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांच्यावर बोलता येत नसल्याने ते माझ्यावर टीका करत असावेत असा टोला त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लगावला. धनंजय महाडिक यांना भूतकाळात घेऊन जायचं असल्याचे त्यांनी सांगत ताराराणीच्या आघाडीतून आपण महापालिकेच्या सत्तेत होतो असं त्यांनी म्हटलं. आम्ही टॅगलाईनच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने बोलत आहोत. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्याने ते आमच्यावर बोलत असल्याची टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या























