धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
वरळी डोममध्ये काल डोमकावळे जमले होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वरळीतील महायुतीच्या सभेवरुन जोरदार टीका केली.

मुंबई : राज्यातील बिनविरोध निवडणुकांचा (Election) पॅटर्न आगामी निवडणुकांसाठी घातक पायंडा पडत असल्याचं शिवसेना आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांकडून म्हटलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि मनसेच्यावतीने वचननामा जाहीर करण्यात आला. त्यावेळी,बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे (Rahul narvekar) निलंबन करण्याची मागणी केली.
वरळी डोममध्ये काल डोमकावळे जमले होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वरळीतील महायुतीच्या सभेवरुन जोरदार टीका केली. मुंबईतील महापौर मराठीच होणार असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील छोट्या कामाचा श्रेय घेण्यापेक्षा मोठ्या कामाचा श्रेय घ्यावं, अरबी समुद्र, गंगा आणली, कैलास पर्वत तुम्ही निर्माण केला हे श्रेय घ्या. समुद्रमंथन तुम्हीच आणला, अशी फटकेबाजी उद्धव ठाकरेंनी केली.
राज्यात एकूणच झुंडशाही सुरु झाली आहे, लोकशाही आत्ता संपली आहे. मतचोरीनंतर आता उमेदवारांची पळावापळवी सुरु केली आहे, निवडुका बिनविरोध होत आहेत. राहुल नार्वेकर धमक्या देतोय, हा विषय निवडणूक आयोगाने गांभिर्याने घेतला पाहिजे आणि अध्यक्ष म्हणून निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, नार्वेकरांनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अध्यक्ष कोणाच्या पक्षाचे नसतात, ते आमदारासारखे वागू शकत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. दमदाटी करून बिनविरोध उमेदवार निवडून आणले जात आहेत, त्यांनी त्या ठिकाणच्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलं आहे. त्यामुळे, जिथे बिनविरोध निवडणूक झाल्या, तिथे पुन्हा निवडणूक घेतल्या पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी, राज ठाकरे हे 20 वर्षांनी शिवसेना भवनात आल्याचा आवर्जून उल्लेख केला. यावर राज ठाकरे यांनी मिश्कील टिप्पणी केली. संजय राऊत यांनी मी 20 वर्षांनी आल्याचा उल्लेख केला. ते ऐकून मला वाटत होतं की, मी 20 वर्षांनी सुटून आलोय, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.
राज ठाकरे काय म्हणाले
20 वर्षानंतर इथं आलोय, मला तुरुंगातून सुटून आल्यासारखा वाटतंय. खूप वर्षांनी मी सेना भवनात आलोय, मी नव्या शिवसेना भवनमध्ये पहिल्यांदा आलोय. जुन्या शिवसेना भवनमधील आठवणी रोमांचकारी आणि आनंदी होत्या. सन 1977 साली शिवसेना भवन सुरू झालं, तेंव्हापासूनच्या सगळ्या आठवणी आहेत. शिवशाही-शिवशक्तीचा हा संयुक्त वचननामा जाहीर करत आहोत.
आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांनी तश्या गोष्टी सगळ्या सांगितल्याच आहेत, असेही राज ठाकरेंनी म्हटले. त्यानंतर, बिनविरोध निवडणुकांवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं.
महाराष्ट्राचा युपी-बिहार करताय
बिनविरोध निवडणूक पश्चिम बंगालमध्ये झाल्या होत्या, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. तुम्ही जेंव्हा जाल आणि जे पायंडे तुम्ही पाडले, त्यानंतर तुम्ही तक्रार करू नका. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे, पण या महाराष्ट्राचा तुम्ही युपी-बिहार करताय, अशा शब्दात राज ठाकरेंनी बिनविरोध निवडणुकांवरुन हल्लाबोल केला.





















