Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
Vasai-Virar Municipal Election 2026: बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते विजय गुड्डू तिवारी यांच्या पक्षांतराचा एक अजब प्रकार वसई विरार शहरात घडला आहे.

वसई-विरार : राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नाराज उमेदवार इतर पक्षांमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. अशातच वसई विरार महापालिका निवडणुकीत एक अजबच प्रकार चर्चेत आला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते विजय गुड्डू तिवारी यांच्या पक्षांतराचा एक अजब प्रकार वसई विरार शहरात घडला आहे.
वसई–विरार शहरात तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. तिकीट वाटप, नाराजी, पक्षांतर आणि आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान एका कार्यकर्त्याच्या अजब पक्षप्रवेशाची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता विजय ऊर्फ गुड्डू तिवारी याने एका दिवसात भाजप आणि पुन्हा बविआमध्ये प्रवेश केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपचे नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन नाईक यांनी समाजमाध्यमांवर तिवारीने भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी तिवारीने समाजमाध्यमांवर बविआचा शेला परिधान करत आपण बविआचाच कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना तिवारी म्हणाला की, तो काही कामानिमित्त भाजप कार्यालयात गेला होता. मात्र तेथे गळ्यात शेला घालून पक्षप्रवेश झाल्याची घोषणा करण्यात आली. आपण कोणताही पक्ष सोडलेला नसल्याचा त्याचा दावा आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सकाळी भाजपात संध्याकाळी पुन्हा घरवापसी
बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते विजय तिवारी उर्फ गुड्डू यांनी पक्षप्रवेश केल्याचा फोटो शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो भाजप नेते आणि नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन नाईक यांनी पोस्ट केला होता, एवढचं नाही तर विजय तिवारी उर्फ गुड्डू यांनी पक्षप्रवेश केल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर दुसऱ्यादिवशी विजय तिवारी उर्फ गुड्डू यांनी आपण कोणत्याही प्रकारचा पक्षप्रवेश केला नसून बहुजन विकास आघाडीसोबत एकनिष्ठ असल्याचा फोटो स्वत:च्या सोशल मीडियावर पोस्ट केला. यावेळी त्यांनी बहुजन विकास आघाडी पक्षाचा शेला गळ्यात घालून आपण बहुजन विकास आघाडीचेच कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणामुळे वसई विरारचे राजकारण चांगलच चर्चेत आले.
या घटनेबाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार विजय तिवारी उर्फ गुड्डू यांनी स्पष्ट केले की, ते त्यांच्या सहकाऱ्यासह भाजप कार्यालयात काही कामानिमित्त गेले होते. मात्र तिथे गेल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात भाजपचा शेला घालून त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचे जाहीर केले. विजय तिवारी उर्फ गुड्डू यांचे हे स्पष्टीकरण चर्चेचा विषय ठरत आहे.























