Nagpur Sports : नागपूरच्या जयंत दुबळेचा इंग्लंडमधील नॉर्थ चॅनल पोहून नवा विक्रम; जगातील सात कठीण समुद्रापैकी एक खाडी पार
ILDSA नुसार नॉर्थ चॅनल ही जगातील 7 समुद्रापैकी 1 सगळ्यात कठीण अशी खाडी आहे. तिचे अंतर 34.4 किलोमीटर (21.4 माईल) असले तरी प्रत्यक्षात स्वीमरला 40 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पोहताना पार करावे लागते.
Nagpur News : नागपूरच्या (Nagpur) वीस वर्षीय आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंतने 20 सप्टेंबर रोजी इंग्लंडच्या युनायटेड किंग्डममध्ये येणाऱ्या नॉर्दन आयर्लंड (Northern Ireland) येथील दोनागडी बंदरा जवळील नॉर्थ अटलांटिक महासागर (North Atlantic Ocean) आणि आयरिश समुद्रातील नॉर्थ चॅनलच्या खाडीमध्ये (In The North Channel Sea in The Irish Sea) पहाटे 6 वाजून 31 मिनिटांनी सूर मारून नॉर्थ चॅनल पोहण्याच्या धाडसी अभियानाला प्रारंभ केला. नॉर्दन आयर्लंड ते साऊथ वेस्टर्न स्कॉटलंड दरम्यानची नॉर्थ चॅनल 14 तास 39 मिनिटांमध्ये जयंतने आपल्या टीमच्या सहकार्याने पोहून नवा विक्रम प्रस्थापित केला. नॉर्दन आयर्लंड आणि स्कॉटलंड दरम्यानची नॉर्थ चॅनेल पोहणारी आशिया खंडातील पहिली रिले टीम ठरली आहे.
नॉर्थ चॅनेल जगातील कठीण खाडीपैकी एक
आयरिश लॉंग डिस्टन्स स्विमिंग असोसिएशन (ILDSA) यांनी सांगितल्यानुसार, नॉर्थ चॅनेल ही जगातील सात समुद्रापैकी एक सगळ्यात कठीण अशी समजल्या जाणारी खाडी आहे. तिचे अंतर 34.4 किलोमीटर (21.4 माईल) (Irish Long Distance Swimming Association) असले तरी प्रत्यक्षात स्वीमरला 40 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पोहताना पार करावे लागते. अतिशय थंड वातावरण. 12 सेल्सिअस डिग्री पासून ते 15सेल्सिअस डिग्री पाण्याचे तापमान असते. त्यासोबतच गतीने वेगाने वाहणारे वारे, समुद्रातील जेलीफिश हे अतिशय कॉमन असतात. त्यासोबतच नाटोरीयन सी लॉयन आणि अनेक जलचर प्राण्यांचा अडथळा हा जलतरणपटूंना पार करावा लागतो.
वेगवान वारे अन् 12 अंशाचे तापमान
गत तीन दिवसापासून योग्य अशा वातावरणाची आम्ही वाट पाहत होतो. इन्फिनिटी चॅनल स्विमिंगच्या जॅकलीन यांनी 20 सप्टेंबरला पहाटे पाच वाजता आम्हाला स्टार्टिंग पॉईंटवर उपस्थित राहण्यासाठी सांगितले. त्यानुसार आम्ही उपस्थित झालो. परंतु अतिशय वेगाने वाहणारे वारे यामुळे आम्हाला सुरुवात करतानाच योग्य वेळेची दीड तास वाट पहावी लागली. समुद्रातील बारा ते पंधरा सेल्सिअस डिग्रीच्या थंड पाण्यात पोहणे त्यासोबतच अतिशय वेगाने वाहणारे थंड वारे, समुद्रातील जेलीफिष चा सामना करणे हे माझ्यासाठी अतिशय नवीन होते, त्याला मी यशस्वीपणे शह देऊन शकलो हा विक्रम करू शकलो, याचा मला आनंद होत आहे. या विक्रमामुळे महाराष्ट्रातील तसेच देशातील ओपन वॉटर युवा जलतरणपटूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे ,असे जयंतने ने सांगितले.
अनेक आव्हानांवर केली जयंतने मात
या सागरी साहसी धाडसी मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील शेवटच्या चार तासांमध्ये वातावरणात अचानक बदल झाला वादळासारखे वारे वाहू लागले त्यामुळे प्रचंड मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. अंधारही पडायला सुरुवात झाली होती, माझ्यासाठी हा जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंग होता परंतु अशा या बिकट परिस्थितीचा ही सामना करून मी ही मोहीम पूर्ण करू शकलो, याचा मला आनंद आहे. प्रत्यक्षात नॉर्थ चॅनेल पोहण्याचा निर्धार मी गेल्या दोन वर्षांपूर्वीच केल्या होता. मी ,माझी आई व माझे वडील आमचे तिघांचेही विमानाची तिकीट काढले होते. परंतु कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. त्यातच कोरोनामुळे माझ्या आईचे दुःखद निधन झाले. त्यानंतर मी हा प्रयत्न करण्याचे सोडले होते. परंतु माझ्या वडिलांनी आणि माझ्या कुटुंबियांनी मला धीर दिला आणि माझ्या आईच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासोबत होता. त्यामुळेच त्यामुळे मी ही धाडसी सागरी मोहीम पूर्ण करू शकलो, असल्याचे जयंत म्हणाला.
नॉर्दन आयर्लंडच्या सरावाचा लाभ
युनायटेड किंगडम येथील वातावरणामध्ये अचानक होणाऱ्या बदलाचा त्याचप्रमाणे थंड पाण्याचा सराव करण्यासाठी मी गत पंधरा दिवसापासून माझे प्रशिक्षक असलेले वडील डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्दन आयर्लंड येथे सराव प्रारंभ केला होता. माझा कठीण सराव हे अभियान पूर्ण करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरला असे जयंत पुढे म्हणाला. मुंबई येथील मूळचे नागपूरचे असलेले प्रबोध हळदे आणि नागपूर येथील हळदे परिवार यांनी माझे मनोबल वृद्धिंगत केले, तसेच माझ्या सर्व चहात्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल सर्वांचा आभारी जयंतने मानले.
सघांत विविध राज्यातील जलतरणपटूंचा सहभाग
वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन (WOWSA) ने निर्धारित केलेल्या सात सागरातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या नॉर्थ चॅनल पोहण्याच्या जयंतच्या रिले टीममध्ये मध्य प्रदेश पश्चिम, बंगाल, आसाम, हरियाणा आणि तामिळनाडू येथील एकूण सहा जलतरणपटूंचा समावेश होता. जयंतच्या या भरीव यशाबद्दल राज्यासह संपूर्ण देशातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. जयंत जयप्रकाश दुबळे हा 4 महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिटचा कॅडेट असून ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन मध्ये बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन च्या तिसऱ्या वर्षीचा विद्यार्थी आहे.
एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
जयंतने यापूर्वी वेस्ट बंगाल येथील जगातील सर्वात लांब पल्ल्याची 81 किलोमीटर अंतराची जलतरण स्पर्धा बारा तास 29 मिनिटांमध्ये पोहून यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. तसेच गुजरात येथील 35 किलोमीटर अंतराची स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि गोवा येथील 140 किलोमीटर अंतराचे स्टेजेस सी स्विमिंग अभियान पूर्ण केलेले आहे. गतवर्षी श्रीलंका आणि इंडिया या दरम्यानची PALK STRAIT नऊ तास वीस मिनिटांमध्ये पाहून जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या वेगवान जलतरणपटू बनण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे. जयंतच्या या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आलेली आहे.
नागपूर आणि मुंबई येथील सराव उपयुक्त
जयंतच्या या धाडसी सागरी मोहिमे करिता आयरिश लॉन्ग डिस्टन्स स्विमिंग असोसिएशनचे ऑबजरवर जेन या होत्या. जयंतच्या सुरक्षे करिता सुसज्ज असलेली इंफिनिटी चॅनल स्विमिंग, नॉर्दन आयर्लंडची अनंत्या ही बोट होती. बोटचे पायलट/स्किपर पॅड्रिक हे होते. जयंतने नॉर्थ चॅनल पार केल्यानंतर नॉर्दन आयर्लंड येथील जेनिफर आणि जेफ यांनी ज्यांचे अभिनंदन केले. जयंतने आपल्या या धाडसी सागरी जलतरण मोहिमेद्वारे ड्राव्हनिंग प्रिव्हेन्शन व ग्लोबल वार्मिंग बाबतही जनजागृतीचा संदेश दिला. जयंतने या अभियानासाठी आपला जलतरणाचा सराव मुंबई जुहू बीच येथील भारतातील पहिल्या समुद्री जलतरण प्रशिक्षण केंद्र तसेच नागपूर येथील एम. एस. डी. स्कूल, ललिता पब्लिक स्कूल, ईस्टर्न स्पोर्ट्स क्लब, महानगरपालिका आणि एन.आय.टी. येथील स्विमिंग पूल तसेच अंबाझरी तलाव येथे डॉ. जयप्रकाश दुबळे आणि डॉ. संभाजी भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सराव केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या