देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Maharashtra CM Face: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीनं घवघवीत यश मिळवलं आहे. अशातच आता तिढा आहे मुख्यमंत्रीपदाचा. मुख्यमंत्रीपदी कोण यावर सध्या महायुतीत खलबतं सुरू आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीसांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra CM Face: राज्याच्या विधानसभा (Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024) निकालानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीच्या (Mahayuti) बाजून कौल दिला. मतदार राजानं अगदी भरभरून मतांचं दान महायुतीच्या पदरात टाकलं. अशातच आता तिढा आहे तो म्हणजे, मुख्यमंत्रीपदाचा. राज्याच्या सत्तेची चावी तर महायुतीला मिळाली, पण मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सध्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपचाच असणार, अशी माहिती विश्वसनिय सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. अशातच महायुतीतला तिसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नावाला पसंती दर्शवली आहे. तसा ठरावही राष्ट्रवादीचे सर्व मंत्री करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे आरएसएसनंही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदी आरएसएस आणि भाजप हायकमांडची पसंती असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या पाठिंब्यासोबतच फडणवीस यांच्या नावाला महायुतीतूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आक्षेप नसल्याचं जाहीर करुन टाकलं आहे.
महाराष्ट्राचे संभाव्य मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनेक स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. संघाच्या कोणत्याही बड्या नेत्यानं आजवर असं कोणतंही वक्तव्य उघडपणे केलेलं नसलं तरी संघाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संघाचे स्वयंसेवक असलेले देवेंद्र फडणवीस हीच त्यांची स्वाभाविक निवड आहे.
संघाकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला समर्थन मिळण्याची कारणं...
- देवेंद्र फडणवीस स्वतः संघाचे स्वयंसेवकर आहेत.
- नेहमीच देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या राजकीय आचरणामध्ये संघाच्या शिस्तीचं पालनं केलं आहे आणि राजकीय फायदे, नुकसान याची चिंता न करता त्यांनी कधीच स्वतः संघाचे स्वयंसेवकर असल्याची बाब लपवली नाही.
- देवेंद्र फडणवीस अनेकदा संघाच्या कार्यक्रमांमध्ये उघडपणे सहभागी होतात. विजयादशमीच्या संघाच्या उत्सवात ते संघाच्या पूर्ण गणवेशात सहभागी होतात.
- देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्यानं त्यांचा संघाच्या सर्व स्तरांवर, सरसंघचालकांपासून खालच्या स्तरापर्यंत थेट संवाद आहे.
- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत संघ आणि संघ परिवारातील सर्व संघटनांनी भाजपसाठी जोरदार प्रयत्न केले. या काळात देवेंद्र फडणवीस हे सर्व प्रमुख पातळ्यांवर संघाच्या थेट संपर्कात होते.
- विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरदारपणे मांडला होता आणि राजकीय फायदा-तोट्याची पर्वा न करता संघाचा हिंदुत्वाचा मूळ विचार मांडला होता.
- एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसारख्या महायुतीतील इतर नेत्यांनी राजकीय फायदा-तोटा लक्षात घेऊन काँग्रेसचा वोट जिहाद आणि मुस्लिम तुष्टीकरण या मुद्द्यांना हात लावला नाही.
- फडणवीसांच्या तुलनेत महाराष्ट्रातील इतर नेत्यांमध्ये विकास, हिंदुत्व आणि सर्व जातींना बरोबर घेऊन सरकार चालवण्याची क्षमता नाही.
- महाराष्ट्रात गेल्या 15 वर्षांत झालेल्या राजकीय पेचप्रसंगातही भाजपच्या आमदारांना एकत्र ठेवण्यात फडणवीस यशस्वी ठरले.
- फडणवीसांबाबतच्या या सर्व गोष्टी आरएसएस आणि भाजप हायकमांडला चांगल्या प्रकारे माहीत आहेत.
दरम्यान, ही सर्व कारणं समोर आली असली तरीसुद्धा अद्याप मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी शिवसेनेच्या सर्व नेत्यांची, आमदारांची इच्छा आहे. त्यामुळे महायुतीत अद्याप मुख्यमंत्री पदाचा तिढा कायम आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच जर मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडली, तर सध्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या एकनाथ शिंदेंचं काय? एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.