(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
CNG Price Hike : सीएनजीच्या दरांत किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याची झळ आता थेट मुंबईकरांच्या खिशाला बसणार आहे. मुंबईच्या उपनगरात धावणाऱ्या रिक्षाच्या दरांत वाढ होण्याची शक्यता आहे.
CNG Price Hike: विधानसभा निवडणुकांचे निकाल (Vidhan Sabha Election 2024) जाहीर होऊन दुसराच दिवस उजाडलाय, तर तिकडे सीएनजीच्या दरांत (CNG Rate) किलोमागे तब्बल 2 रुपयांची वाढ झाली आहे. आता सीएनजीच्या दरांत वाढ झाल्यामुळे परिणामी रिक्षाच्या भाडेदरांतही वाढ (Rickshaw Fares Increased) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता चाप बसणार आहे. सीएनजीच्या दरांत (CNG Rates) वाढ झाल्यामुळे रिक्षाच्या भाडेदरांत प्रति किलोमीटर 2 ते अडीच रुपयांची वाढ करण्याची मागणी रिक्षा युनियननं केली आहे.
सीएनजीच्या दरांत किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याची झळ आता थेट मुंबईकरांच्या खिशाला बसणार आहे. मुंबईच्या उपनगरात धावणाऱ्या रिक्षाच्या दरांत वाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षाच्या दरांत प्रति किलोमीटर 2 ते 2.50 रुपयांची वाढ करण्याची मागणी रिक्षा युनियननं केली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा रिक्षा प्रवास महागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडनं 22 नोव्हेंबरपासून सीएनजीच्या दरांत वाढ केली आहे. त्यानुसार आता प्रतिकिलो सीएनजीसाठी 75 ऐवजी 77 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, बस यांसारखी सार्वजनिक परिवहन वाहनं सीएनजीवर विसंबून असतात. त्यामुळे या वाहनांना सीएनजीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून त्याचा भुर्दंड मुंबईकरांना सोसावा लागणार आहे. रिक्षापाठोपाठ टॅक्सी आणि इतर वाहनांच्या भाडेदरांत वाढ होण्याची शक्यता आहे.
IGL आणि अदानी टोटल गॅससारख्या कंपन्या स्वस्त गॅसच्या पुरवठ्यात दुसऱ्यांदा कपात केल्यानंतर किमती आणखी वाढविण्याचा विचार करत आहेत. मुंबईत सीएनजीचे दर आधीच वाढले आहेत. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने मुंबईत CNG च्या दरांत 75 रुपये प्रति किलो वरून 77 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ केली आहे. स्वस्त गॅसचा पुरवठा कमी होत असल्यानं दर वाढवण्याची नामुष्की ओढवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सीएनजीच्या दरांत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांवर दिवसेंदिवस महागाईचा बोजा वाढत आहे.
रिक्षा युनियनकडून भाडेवाढ करण्याची मागणी
सार्वजनिक परिवहन वाहनांपैकी रिक्षाचालकांच्या युनियननं भाडेदरात दोन रुपयांची वाढ करण्याची मागणी पुढे रेटली आहे. सरकारनं मान्यता दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार, रिक्षाच्या भाडे दरांत प्रति किलोमीटर 2 ते 2.50 रुपयांची वाढ झाली पाहिजे, अशी माहिती मुंबई रिक्षामन युनियनच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली आहे. मुंबई शहरासह संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात दहा लाखांहून अधिक वाहनं सीएनजीवर चालतात. रिक्षापाठोपाठ टॅक्सी आणि इतर वाहनांच्या भाडेदरांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.