चौकात भोंगे लावून पंतप्रधान मोदींच्या जुन्या भाषणाची आठवण, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावरुन राष्ट्रवादीचं आंदोलन
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरासंदर्भात नागपूरच्या शंकरनगर चौकात भोंगे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले की नाही झाले,' या वाक्याची आठवण राष्ट्रवादीने करुन दिली
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात अनोखं आंदोलन केलं. 'लाव रे तो ऑडिओ' या पद्धतीचं हे अभिनव आंदोलन होतं. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरासंदर्भात नागपूरच्या शंकरनगर चौकात भोंगे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणातले 'पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले की नाही झाले,' या वाक्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसने करुन दिली
विशेष म्हणजे शंकरनगर चौक हे नागपुरातील एक व्यस्त चौक असून नागपुरातील सर्वात मोठ्या पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप शंकरनगर चौकात आहे. त्याच पेट्रोल पंपासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीत इंधनाच्या दरावरुन काही राज्यांची यादी करुन सुनावलं होतं. राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच देशहितासाठी व्हॅट कमी करण्याचं आवाहन देखील केलं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानांचे जुने ऑडिओ लावत नागपुरात अनोखं आंदोलन केलं.
भाजपशासित राज्यांपेक्षा बिगर भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर जास्त : पंतप्रधान मोदी
विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी न करणाऱ्या राज्यांना सुनावलं. बिगर भाजपशासित राज्यांमध्ये भाजपशासित राज्यांपेक्षा पेट्रोल-डिझेलचे दर जास्त असल्याचं मोदींनी सांगितलं. यावेळी मोदींनी महाराष्ट्राचाही उल्लेख केला. मोदी म्हणाले की, "भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये सामंजस्य आवश्यक आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा प्रभावित झाला आहे. अशा वातावरणात आव्हानं वाढत आहेत. आम्ही नोव्हेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. राज्यांनाही तसं करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. काही राज्यांनी व्हॅट कमी केला पण काही राज्यांनी त्यांच्या राज्यातील लोकांना लाभ दिला नाही. त्यामुळे या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. एकप्रकारे हा या राज्यांतील लोकांवर अन्यायच आहे, पण त्यामुळे शेजारील राज्यांचेही नुकसान होत आहे. जी राज्ये कर कमी करतात त्यांचा महसूल बुडतो. गुजरात आणि कर्नाटकने कर कमी केले आहेत. गुजरातने कर कमी केला नसता, तर त्यालाही साडेतीन हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला असता. त्याच वेळी, काही राज्यांनी व्हॅट कमी केला नाही आणि या कालावधीत साडेतीन ते पाच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळवला.
कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या : संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कालच्या बैठकीवरुन टीका केली आहे. आज माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, कालच्या बैठकीवर मी बोलणं योग्य नाही. कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या. पंतप्रधानांनी एकतर्फी संवाद साधला. बिगरभाजप शासित राज्यांचं म्हणणं आहे की, पंतप्रधानांचं वागणं त्यांच्यासाठी वेगळ आणि भाजपशासित राज्यांसाठी वेगळं होतं. बिगर भाजपशासित राज्यांना टोमणे मारण्याचं जास्त काम झालं. पंतप्रधान मोदी कोरोनासंदर्भात मार्गदर्शन करणार होते पण त्यांनी पेट्रोल डिझेल व्हॅटचा विषय काढला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीबाबत मराठी बाण्यानं जोरदार उत्तर दिलं आहे. देशाच्या पंतप्रधानांची देशासाठी जशी भूमिका असायला हवी होती, तशी भूमिका नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
Sanjay Raut : संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या