कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
अमित शाह यांनी संसदेत भाषण करताना पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर इंदिरा गांधी आणि नंतर सोनिया गांधींचा निवडणुकीतील विजय ही सर्वात मोठी व्होटचोरी असल्याचा गंभीर आरोप आज सभागृहात बोलताना केला.

मुंबई : राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय बदलाचे वारे वेगाने वाहिले असून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. मात्र, तेव्हापासूनच भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) राजकीय युद्ध सुरू झालं आहे. त्यावरुन, सातत्याने भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकमेकांवर टीकेची झोड उठवतात. अनेकदा व्यक्तिगत टीका टीपण्णी देखील केल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाहांचा (Amit shah) एका व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. तसेच, कोण होतास तू, काय झालास तू? असे म्हणत अल्पसंख्यांकांची मतं मिळवण्यासाठी हिंदुत्त्व सोडल्यावरुन अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
अमित शाह यांनी संसदेत भाषण करताना पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर इंदिरा गांधी आणि नंतर सोनिया गांधींचा निवडणुकीतील विजय ही सर्वात मोठी व्होटचोरी असल्याचा गंभीर आरोप आज सभागृहात बोलताना केला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला. सध्या, न्यायाधीशांच्या निर्णयावरही आक्षेप घेतला जात आहे, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे. आपल्या व्होट बँकेसाठी हे अशापद्धतीने महाभियोग आणत आहेत, उद्धव ठाकरेंनी यावर सही केलीय, असे म्हणत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंनीही मतपेढीचं राजकारण केल्याचे अमित शाहांनी म्हटले. दरम्यान, हे जजमेंट काय आहे तर, एका डोंगरावर सर्वांच उंच दिवा पेटवला जावा, या निर्णयावरुन हा प्रस्ताव आल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, अमित शाह यांचा संसदेतील भाषणाच्या व्हिडिओची एक क्लिप शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. कोण होतास तू, काय झालास तू? असे म्हणत देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
कोण होतास तू, काय झालास तू?#UddhavThackeray pic.twitter.com/ZWsT4gu1CY
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 10, 2025
संसदेत विरोधकांचा सभात्याग
राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेले मतचोरीचे सर्व आरोप अमित शाहांनी फेटाळले. व्होटचोरीच्या आरोपांवरुन आज दिल्लीच्या सभागृहात जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर संतापलेल्या विरोधकांनी सभात्याग करत निषेध व्यक्त केला. लोकसभेत अमित शहा यांनी इलेक्टरल रिफॉर्मवर चर्चा करताना विरोधकांना धारेवर धरलं. त्यांच्या भाषणात त्यांनी नागरिकत्व, SIR, VVPAT, मतदार याद्या अश्या अनेक मुद्द्यांना हात घातला आणि त्याची उदाहरणं देत विरोधकांवर हल्लाबोल केला.
























