RTMNU Elections : विद्यापीठ अधिसभा पदवीधर निवडणूक : अंतिम मतदार यादीत गंभीर चुका, पत्ता नसलेले मतदार साडेसात हजारांवर
RTMNU: संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी संपर्क साधून स्वतः नोंदणी करुन घेतली. त्यामुळे काहींनी आपले गणित जुळवून आण्यासाठी तर पत्ते नसलेले मतदार नोंदणी केले नाही ना अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) 11 डिसेंबर रोजी अधिसभेच्या पदवीधर प्रवर्गातील 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र, विद्यापीठाने जाहीर केलेली अंतिम मतदार यादी चुकांनी भरलेली आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीत विशिष्ट उमेदवारांना फायदा व्हावा, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने जाणीवपूर्वक अनेक बनावट मतदारांना स्थान दिल्याचाही आरोप होत आहे. विद्यापीठाद्वारे (RTMNU) 11 डिसेंबरला पदवीधर प्रवर्गातील दहा जागांसाठी 11 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका आहेत. अनेक मतदारांचे पत्ते चुकवण्यात आले असून त्यामुळे त्याचा फटका उमेदवारांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ही चूक केवळ एक-दोन मतदारांची नाही, तर संपूर्ण 444 मतदारांची झाली आहे. याशिवाय 132 मतदारांच्या पत्त्यावर फक्त 'पीटर' लिहिण्यात आले आहे. तसेच 324 मतदारांचे तहसील 'शंभर' असे नमूद करण्यात आले आहे. 51 मतदारांचे तहसील म्हणून 'राम', 16 मतदारांसमोर 'जीएचजीएच' आणि 11 मतदारांचे तहसील म्हणून 'एफजीएचएच..' असे लिहिले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशावेळी उमेदवारांचेही टेन्शन वाढले असून केवळ काही मोजक्या संघटनेसाठी विद्यापीठ काम करत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला आहे.
पत्ता नसलेले 7 हजार 540 मतदार
विद्यापीठाच्या (RTMNU) मतदार यादीतील चुकांची यादी खूप मोठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 हजार 540 मतदारांच्या नावांविरोधात कोणताही पत्ता लिहिलेला नाही. अशा स्थितीत हा मतदार कुठला रहिवासी आहे? तुम्ही तिथे किती दिवस राहत आहात? की हे बनावट मतदार आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा त्रुटी दूर करण्यासाठी विद्यापीठाने कोणतीही यंत्रणा उभारली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. माजी सिनेट सदस्य प्रशांत डेकाटे आणि अॅड. मनमोहन बाजपेयी यांनीही या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
मतदार नोंदणीसाठी संघटनांचेच प्रयत्न
अधिसभेच्या पदवीधर प्रवर्गातील निवडणुकीसाठी मतदार नोंदणीसाठी विद्यापीठाने फक्त तारखांची घोषणा केली. मात्र मतदार नोंदणीसाठी कुठलाही उत्साह दाखवला नाही. तसेच मतदारांसाठी नोंदणीसाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. मात्र मतदार नोंदणीसाठी शेवटच्या घटकेपर्यंत संघटनाच अॅक्टिव्ह दिसून आल्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी संपर्क साधून स्वतः नोंदणी करुन घेतली. त्यामुळे काही संघटनांनी आपले गणित जुळवून आण्यासाठी तर पत्ते नसलेले मतदार नोंदणी केले नाही ना असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
ही बातमी देखील वाचा