Nagpur : शहरातील भूखंडधारकांवर महानगरपालिकेची तब्बल 284 कोटींवर थकबाकी; खरंच मालमत्ता जप्त होणार?
लाखोंची थकबाकी असताना मनपा पथकाकडून जप्ती दाखवून नंतर साहित्य सोडून देण्यात आले. यावरून मनपाला थकबाकीची कोटयावधीची रक्कम वसुलायची आहे, की केवळ कारवाई दाखवायची आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय.
Nagpur News : आर्थिक अडचणीत अडकलेल्या नागपूर महापालिकेला (Nagpur Municipal Corporation) शहरातील 75 हजारांवर मोकळया भूखंडधारकांनी कोट्यवधीचे कर थकवले आहेत. या भूखंडधारकांवर तब्बल 284 कोटी 6 लाख 60 हजारांची थकबाकी आहे. या मालमत्ताधारकांना यापूर्वीही जप्तीची नोटीस बजावण्यात आली. मात्र, अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. नुकतेच सोमवारी आशीनगर झोनमध्ये 8 मालमत्ताधारकांवर करण्यात आलेल्या कारवाईतही जप्तीचा दिखावा करण्यात आला होता. लाखोंची थकबाकी असताना जप्ती दाखवून नंतर साहित्य सोडून देण्यात आले. यावरून मनपाला थकबाकीची कोटयावधीची रक्कम वसूल करायची आहे, की केवळ कारवाई दाखवायची आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. मालमत्ता कर विभागाला प्रशासकाच्या अर्थसंकल्पात 300 कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. नोव्हेंबरपर्यंत या विभागाने 107 कोटींचे उत्पन्न प्राप्त केले होते. शहरात थकबाकीदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र, मालमत्ताधारकांनी हे प्रयत्न उधळून लावले. त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता शेवटची संधी देऊन भूखंड जप्तीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, ही जप्ती खरी ठरेल का, याबाबत शंका घेतली जात आहे.
5928 भूखंडाचा लिलाव ठरला
अनेक वर्षापासून थकबाकी असलेल्या 5 हजार 928 भूखंडांचा यापूर्वी लिलाव करण्याचा निर्णय घेतला. लिलाव करण्यात येणाऱ्या भूखंडात हनुमानगर झोनमधील मानेवाडा, बाभुळखेडा येथील 616, सोमलवाडा, बाभुळखेडा येथील 430 आणि हुडकेश्वरमधील 4 हजार 882 भूखंडांचा समावेश आहे. अजूनही शहरातील 75 हजार मोकळ्या भूखंडावर 280 कोटी 6 लाख 60 हजारांची थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकीदार 28331 आसीनगर झोनमध्ये असून, त्यांच्यावर 151 कोटी 15 लाख 57 हजार 412 एवढी थकबाकीची रक्कम आहे. या भूखंडधारकांना मनपाने अनेकदा नोटीस बजावली आहे, हे विशेष.
आशीनगरमध्ये कारवाईचा बनाव
सोमवारी आशीनगर झोनमध्ये कुलदीप कौर बलविंदरसिंग सग्गु, (जगत सेलीब्रेशन हॉल, पावरग्रीड चौक, नागपूर), देवेन्द्र नामदेवराव पवार (पवार सावजी भोलनालय, पाटणकर चौक, नागपूर.), भिषण भाऊ मुकेश भा. उमेश संतलाजी हासानी, प्रितमसिंग चरणसिंग गुज्जर, प्लॉट नं. 129, 129 / अ (गुज्जर लॉन, पाटणकर चौक, नागपूर), प्रतिभा अश्विन शंभरकर व इतर अशी मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. मात्र, यातील बहुतांशवर लाखोंची थकबाकी आहे. परंतु, कारवाईत त्यांचे साहित्य जप्त करून नंतर सोडण्यात आले. त्यामुळे ही कारवाई केवळ नावापुरतीच झाली.
मनपा झोन-भूखंडाची संख्या-थकबाकी
- लक्ष्मीनगर - 6925 - 374095526
- धरमपेठ - 7489 - 249620566
- हनुमाननगर - 5928 - 165388113
- नेहरुनगर - 8661 - 181857440
- सतरंजीपुरा - 1044 - 19724575
- लकडगंज - 11578 - 347508713
- आसीनगर - 28331 - 1511557412
- मंगळवारी - 2540 - 350908491
एकूण - 75596 - 2840660836
या संदर्भात मनपाच्या महसूल विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम म्हणाले, थकबाकीदारांना सप्टेंबर अखेरपर्यंत थकबाकी भरण्याची संधी देण्यात आली होती. परंतु, अद्यापही थकबाकी कायम आहे. आता या भूखंडाच्या लिलावाची सूचना देण्यात येईल. त्यानंतर 21 दिवसाची मुदत असेल. त्यानंतरही कर न भल्यास थेट लिलावाची नोटीस जाहीर करून 15 दिवसात कारवाई होईल.
ही बातमी देखील वाचा