Nagpur News : नेदरलॅण्डची कंपनी करणार घनकचरा व्यवस्थापन! देशातील पहिला प्रकल्प नागपुरात
शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच नसल्याने भांडेवाडी येथे कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहे. नेहमीप्रमाणे निवडणुकीनंतर पुन्हा मनपाला या प्रकल्पाचा विसर पडू नये म्हणजे झालं, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
Nagpur News : भारतातील पहिला नावीन्यपूर्ण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नागपूरमध्ये (Nagpur) साकारत आहे. नेदरलॅण्ड येथील कंपनीसोबत नागपूर शहरातील घनकचरा प्रक्रिया आणि व्यवस्थापनासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत नागपुरात झाली.
नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नेदरलॅण्ड येथील एसयूएसबीडीई (Sustainable Business Development) कंपनीचे अध्यक्ष जॉप व्हीनेनबॉस, आमदार प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व अन्य अधिकाऱ्यांशी आज विस्तृत चर्चा केली. भारतात अशा पद्धतीचा हा आगळावेगळा पहिलाच प्रकल्प आहे. नागपूर येथील घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया करताना नागपूर महानगरपालिकेला (Nagpur Municipal Corporation) यासाठी एकही पैसा मोजावा लागणार नाही. नेदरलॅण्ड येथील एसयूएसबीडीई कंपनी स्वतःच हा प्रकल्प तयार करेल. त्यावर खर्च करेल. तो उभारेल, चालवेल आणि त्याची मोफत देखभालही करणार आहे.
जगातील नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करुन वैज्ञानिक पद्धतीने घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यातून अक्षय ऊर्जा निर्मिती, बायो सीएनजी, बायोगॅस, खते आणि पुनर्वापर करता येणारी उत्पादने तयार करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालबद्ध मर्यादेत हा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत एका वर्षात सुरु व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कचरा व्यवस्थापनात मनपा 'फेल'
शहरात दररोज मोठ्या प्रमामावर कचरा तयार होतो. मात्र त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडे यंत्रणाच उपलब्ध नाही. यापूर्वीही अनेक विदेशी कंपन्यांनी नागपूर महानगरपालिकेला भेट देऊन भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र मनपाच्या 'विशेष' अटींमुळे एकही प्रकल्प सुरु होऊ शकला नाही. दुसरीकडे कचरा गोळा करणाऱ्या यंत्रणेकडूनही कचऱ्यात माती आणि सिमेंटयुक्त रेतीची भेसळ करण्यात येत असल्याने भांडेवाडी येथे कचऱ्याचे डोंगरच तयार झाले आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच नसल्याने शहरातील कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये गोळा करण्यात येतो. याठिकाणी कचऱ्याचे डोंगरच उभे राहिले आहेत. परिणामी परिसरातील नागरिकांना दुर्गंध आणि प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात नागरिकांनी अनेकवेळा नेत्यांना निवेदन दिले. मनपामध्ये आंदोलन केले, तरी ही समस्या कायम आहे. यंदाही एक नवीन विदेशी कंपनी प्रकल्पांसाठी इच्छुक असून निवडणुकीनंतर पुन्हा मनपाला याचा विसर पडू नये म्हणजे झालं, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आहे.
ही बातमी देखील वाचा