Nagpur Crime : काश्मीरहून अल्पवयीन मुलीला फुस लावून नागपुरात आणले, शहर भटकंतीने दोघांना तुरुंगात धाडले
Nagpur Crime News : काश्मीर येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला हैद्राबाद येथे घेऊन जाण्याच्या बेतात असलेल्या दोन तरुणांना सीताबर्डी पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे.
![Nagpur Crime : काश्मीरहून अल्पवयीन मुलीला फुस लावून नागपुरात आणले, शहर भटकंतीने दोघांना तुरुंगात धाडले Nagpur crime news two kashmiri youths arrested in nagpur for kidnapping minor girl in kashmir nagpur Maharashtra Nagpur Crime : काश्मीरहून अल्पवयीन मुलीला फुस लावून नागपुरात आणले, शहर भटकंतीने दोघांना तुरुंगात धाडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/ed7ac87de18af7857f818042f2c069a81701094270148290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : काश्मीर येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला हैद्राबाद येथे घेऊन जाण्याच्या बेतात असलेल्या दोन तरुणांना सीताबर्डी पोलिसांना (Nagpur Crime) जेरबंद करण्यात यश आले आहे. ही धक्कादायक बाब सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. जिथे दोन तरुणांनी आधी जम्मू-काश्मीरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावली आणि नंतर तिला नागपूरात आणले. दरम्यान हे तिघे सीताबर्डी परिसरात फिरत असताना पोलिसांनी तिघांनाही थांबवून चौकशी केली. त्यानंतर ही बाब समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपी अटक केली आहे, तर मुलीला शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये 19 वर्षीय आरोपी मुदस्सीर हुसेन मोहम्मद हुसेन आणि त्याचा 19 वर्षीय भाऊ यासीर हुसेन मोहम्मद यासीन असे हे दोन आरोपी असून ते मूळचे जम्मू काश्मीर मधील दोडा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
थेट काश्मीरहून फुस लावून आणले नागपुरात
मिळालेल्या माहितीनुसार, सीताबर्डीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मंगळकर हे आपल्या पथका बरोबर बुधवारी मध्यरात्री सीताबर्डी परिसरात गस्त घालत होते. दरम्यान त्यांना एक मुलगी आणि दोन तरुण या परिसरात फिरताना दिसले. तिघांचेही वर्तन हे संशयास्पद वाटल्याने त्यांना थांबवून येथे फिरण्याबाबत विचारपूस करण्यात आली. त्यांचे बोलणे हे काही अंशी संशयास्पद वाटले तसेच त्यांची सखोल चौकशी दरम्यान विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची नीट उत्तर न दिल्याने त्यांच्यावर आधिक संशय आला. त्यानंतर या तिघांनाही पुढील तपासाकरता पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तपासादरम्यान मुलगी आणि दोघेही तरुण जम्मू-काश्मीरचे रहिवासी असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्याची तक्रार काश्मीरमधील किस्तवाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. चौकशीत आरोपीने मुलीला तेथूनच नागपुरात अपहरण करून आणल्याचे कबूल केले.
फुस लावत ओढले प्रेमाच्या जाळ्यात
या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे दोन्ही आरोपी भाऊ असून मुदस्सीर हुसेन व अल्पवयीन तरुणी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. तरुणीला हैदराबादला घेऊन जाण्याची या दोन्ही तरुणांची योजना होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री नागपुरात उतरल्यानंतर तिघेही रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरत होते. त्यावेळी गस्तीवर असलेल्या सीताबर्डी पोलिसांना या तिघांवर संशय आला आणि त्यांचे बिंग फुटले. यासिर हुसेन हा हैदराबादमध्ये वेटर म्हणून काम करतो. तरुणीला हैदराबादला घेऊन जाण्याची तयारीत असतांना ट्रेनला वेळ असल्याने ते बर्डी परिसरात फिरत होते. दरम्यान, रात्रीच्या गस्तीवर बर्डी पोलिस ठाण्याचे डी.एस.बी पथकाने हे तिघे फिरताना पाहिले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तातडीने दोन्ही तरुणांना अटक केली. या अल्पवयीन मुलीला काटोल रोडवरील शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. सीताबर्डी पोलिसांनी ही बाब तत्काळ किश्तवाड पोलिसांना कळवली असता माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस अल्पवयीन मुलीला आणि दोन आरोपींना आपल्या ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. यासोबतच पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली आहे. मुलीला आपल्या ताब्यात घेण्यासाठी मुलीचे कुटुंबीय देखील नागपूरसाठी रवाना झाले आहे. सीताबर्डी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध आरपीसी 151(1)अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास किश्तवाड पोलिसांच्या हाती दिला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)