(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पान-गुटखा खाणाऱ्यांनो सावधान! चक्क सडलेली सुपारी विक्रीला; पोलिसांच्या कारवाईत मोठा खुलासा
Nagpur Crime News : नागपूरच्या यशोधरानगर आणि कामठी पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत 1500 किलो विक्रीला आणलेली सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे.
Nagpur Crime News : अनेकांना पान (Betel) खाण्याची सवय असते, मात्र तुम्ही खात असलेल्या पानमधील सुपारी तुम्ही कधी तपासून पाहतात का?, कारण नागपुरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत चक्क सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सुपारी (Areca Nut) पान आणि गुटखा तयार करण्यासाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या (Nagpur) यशोधरानगर आणि कामठी पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत 1500 किलो विक्रीला आणलेली सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे. त्या नंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नागपुरात चक्क सडलेली सुपारी विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावत कारवाई केली. यावेळी पोलिसांच्या पथकाला तब्बल 1500 किलो सडलेली सुपारी मिळून आली. त्यामुळे याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली असून, सुपारीचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे.
सडलेल्या सुपारीमुळे कॅन्सरची मोठी वाढ
राजीव पुलिया येथील अनुसया नगरजवळ असलेल्या विनस ट्रेडर्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यात सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे. ही सुपारी विक्रीसाठी पाठवली जात होती. लाखो पान दुकाने आणि शेकडो गुटखा कंपन्यांच्या माध्यमातून सडलेली सुपारी सर्वसामान्यांना खायला दिली जात आहे. त्यामुळे कॅन्सरची मोठी वाढ झाल्याचे तज्ञांचे मत आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर आणखी काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
नागपुरात 24 लाखांची एमडी पावडर जप्त
एकीकडे नागपूर पोलिसांच्या पथकाने सडलेली सुपारी पकडली असतानाच, दुसरीकडे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 24 लाखांची एमडी पावडर जप्त केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाली. शहरात तीन आरोपींकडे मोठ्या प्रमाणावर एमडी पावडर असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली होती. पोलिसांनी आतिश लक्ष्मण बागडे (वय 28 वर्ष, अजनी रेल्वे कॉलनी, आरबी 1/326), गौरव उर्फ सागर शेषराव कटारे (वय 25 वर्ष, टिमकी तीनखंबा चौक, तहसील) यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळून 241 ग्रॅम 5 मिली एमडी आढळली. त्या पावडरची किंमत 24.15 लाख इतकी आहे. या प्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. मात्र, या कारवाईनंतर शहरात एमडी पावडर विक्री होत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :