सरकारची मालमत्ता चोरुन पुन्हा सरकारलाच विकली, नागपुरात वाळू तस्करांचा प्रताप
Sand Mafia In Nagpur : धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षभरात वाळू चोरीचा आकडा 40 हजार ब्रास म्हणजेच 8 हजार ट्रक एवढा आहे.
Sand Mafia In Nagpur : सरकारची मालमत्ता चोरी करून पुन्हा सरकारलाच विकल्याचे कधी पाहिले आहे का? नागपुरात तसंच घडतय...वाळू तस्करांनी राज्य शासनाला कोणताही कर न भरता कोट्यवधींची वाळू चोरलीच नाही. तर विकासकामांच्या नावाखाली पुन्हा ती शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या माथी मारल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षभरात वाळू चोरीचा आकडा 40 हजार ब्रास म्हणजेच 8 हजार ट्रक एवढा आहे.
वाळू सरकारच्या नजरेतून गौण खनिज आहे. मात्र, तस्करांच्या नजरेतून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भातील जंगलातून वाहून येणाऱ्या अनेक नद्यांमध्ये वाळूचे प्रमाण प्रचंड आहे. हीच वाळू सध्या तस्करांसाठी सोन्याची खाण बनली आहे. विदर्भातील, खासकरून नागपूर शहराच्या अवती भोवतीच्या नद्यांतून गेले वर्ष दीड वर्ष जोरात वाळू उत्खनन झाले. जे वाळू घाट सरकारने लिलाव केले होते, तिथून बोगस रॉयल्टीच्या आधारावर वाळू चोरी झाली. तर ज्या घाटाचे लिलाव झालेले नाही, तिथून चोरट्या पद्धतीने वाळूचे उत्खनन करण्यात आले. पोलिसांचा अंदाज आहे की, गेल्या वर्षभरात नागपूर जिल्ह्यात तब्बल 40 हजार ब्रास वाळूचे अवैध उत्खनन आणि नंतर अवैध वाहतूक करण्यात आली. एका मोठ्या ट्रकमध्ये पाच ब्रास वाळू येते. म्हणजेच नागपूर जिल्ह्यात तब्बल आठ हजार ट्रक वाळूचा अवैध व्यवसाय गेल्या वर्षभरात झाला आहे.
सरकारलाच विकली वाळू-
एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण कार्य होत नसताना, एवढी चोरीची वाळू कुठे खपवली जात असेल? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. तर पोलीस तपासात त्याचे उत्तरही समोर आलं आहे. वाळू तस्करांनी चोरीची ही वाळू वेगवेगळ्या सरकारी विभागांच्याच माथी मारली आहे. म्हणजेच शासनाची वाळू चोरून शासनालाच विकल्याचा पराक्रम वाळू तस्करांनी केला आहे. पोलिसांच्या तपासानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे, मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड अशा शासनाच्या विविध विभागांना चोरीची वाळू विकण्यात आल्याचे समोर आले आहे.
कशी केली तस्करी?
शासन आणि प्रशासनाला फसवण्यासाठी वाळू तस्कर नेहमीच नवनवीन युक्ती शोधत असतात. नागपुरात घडलेल्या प्रकारामध्ये वाळू तस्करांची एक अफलातून युक्ती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कुठल्याही नदीपात्रातून रीतसर अर्ज करून, रॉयल्टी भरून वाळू उचलायची. मात्र, रॉयल्टीच्या पावतीवर त्याचा पुरवठ्याचा ठिकाण म्हणजेच destination "नागपूर"( Nagpur) ऐवजी "नागापूर" (Nagapur) टाकायचं... वाशिम जिल्ह्याचा "नागापूर" नागपूर जिल्ह्यातील कुठल्याही वाळू घाटापासून किमान तीनशे किलोमीटर लांब पडतो. म्हणजेच तिथे वाळू पुरवठ्यासाठी 14 ते 15 तासांचा वेळ वाळू तस्करांना मिळतो. मात्र ती वाळू नागापूरला न नेता नागपूरलाच पुरवली जाते. 14 ते 15 तासाच्या वाढीव कालावधीमध्ये अनेक फेऱ्या मारल्या जातात... त्यातील पहिली फेरी नियमानुसार आणि उर्वरित सात ते आठ फेऱ्या अवैधरित्या मारल्या जातात, अशा तऱ्हेने शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जातो...
65 जणांवर गुन्हे -
नागपूर पोलिसांनी आतापर्यंत वाळू चोरीच्या या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये 65 पेक्षा जास्त वाळू तस्करांना आरोपी बनवण्यात आले आहे. दरम्यान वाळूचे अवैध उत्खनन आणि नंतर चोरटी वाहतूकीतून निर्माण होणारे कोट्यवधी रुपये जातर कुठे हे शोधण्यासाठी नागपूर पोलिसांनी सर्व आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास केल्यास वाळू तस्करांसह त्यांना आश्रय देणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि राजकारण्यांपर्यंत पोलीस नक्कीच पोहोचू शकतील.