Nana Patole : नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Assembly Elections 2024 : मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे सांगणारे नाना पटोले यांच्या विरोधात साकोली विधानसभा मतदारसंघात संघाचे भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे.
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) घोषणा झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? याबाबत चर्चांना उधाण आले असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली. आता भाजपकडून (BJP) नाना पटोले यांच्या विरोधात विशेष रणनीती आखली जात आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपची पहिली उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार? याची इच्छुकांना प्रतीक्षा लागली आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे सांगणारे नाना पटोले यांच्या विरोधात साकोली विधानसभा मतदारसंघातून संघाचे माजी प्रचारक सोमदत्त करंजेकर यांना भाजपकडून ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती समोर येत आहे.
साकोलीत भाजप संघाचा चेहरा उतरवण्याच्या तयारीत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात साकोलीत भाजप संघाचा चेहरा उतरवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. संघाचे माजी विदेश विभाग प्रचारक राहिलेले व सामान्य व्यक्तिमत्व प्रसिद्ध डॉ. सोमदत्त करंजेकर साकोलीत मतदारसंघात तयारीला लागले आहेत. 'साकोली मतदारसंघात नाना पटोले अपेक्षित विकास करु शकले नाही. नाना पटोले 35 वर्ष राजकारण करत आहे. पण, रोजगार देऊ शकले नाही, असा साकोलीत मतदारांचा आजही मानस असल्याचे सोमदत्त करंजेकर यांनी म्हटले आहे. आता भाजपकडून सोमदत्त करंजेकर यांना उमेदवारी मिळणार का? किंवा दुसरा उमेदवार नाना पटोले यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवण्यात येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महायुतीच्या रिपोर्ट कार्डवर नाना पटोलेंची टीका
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने संयुक्त पत्रकार परिषद घेत बुधवारी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाचे एक रिपोर्ट कार्ड सादर केले. यावर नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलंय की, महायुती सरकारने रिपोर्ट कार्ड जाहीर केलं. त्यांनी रिपोर्ट कार्ड ऐवजी रेट कार्ड जाहीर करायला हवे. कारण गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या भ्रष्टाचारी सरकारने रेट निर्माण करून महाराष्ट्राची लुट केलीय. गुजरातला महाराष्ट्र विकण्याचं जे काम केलं आहे, त्यासंदर्भात त्यांनी रेट कार्ड जाहीर करायला हवं होतं, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
आणखी वाचा