Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगाव शहरात सुरू असलेल्या मतदानादरम्यान एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये (Kopargaon) सुरू असलेल्या मतदानादरम्यान एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मतदारांवर उमेदवारांचे प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटांनी एकमेकांवर केला.
हा वाद पोलिसांच्या समोरच उफाळून आला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राच्या परिसरातून दूर हटवले. या कारवाईदरम्यान मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्येही शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले.
Kopargaon Nagarparishad Election 2025: काही काळ तणावाचे वातावरण
या घटनेमुळे एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान केंद्राच्या परिसरात भाजप आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने सतर्कता वाढवली. दरम्यान, दुपारनंतर मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सुमारे १८ टक्के मतदान झाले होते.
Kopargaon Nagarparishad Election 2025: काळे–कोल्हे संघर्षाची पार्श्वभूमी
कोपरगावमधील निवडणूक ही काळे आणि कोल्हे गटांच्या वर्चस्वाची मानली जाते. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद निवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या वेळेत थंडीमुळे मतदानाचा वेग काहीसा मंद होता. मात्र, दुपारी अचानक मतदान केंद्रावर गर्दी वाढल्यानंतर मतदारांवर प्रभाव टाकत असल्याचे आरोप दोन्ही गटांकडून करण्यात आले.
Kopargaon Nagarparishad Election 2025: पोलिस प्रशासन सतर्क
मतदान केंद्रावर कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मतदान केंद्रांच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
Sinnar Election 2025: सिन्नरमध्ये बोगस मतदाराला पकडले
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील तीन नगरपरिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. सिन्नरमधल्या तीन, ओझरच्या दोन तर चांदवडच्या एका जागेसाठी मतदानाला होत आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे या दोघांची सिन्नर नगर परिषदेमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यातच सिन्नरच्या प्रभाग 2 च्या मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडल्याची घटना घडली आहे. बनावट आधार कार्ड बनवून तरुण मतदानाला पोहोचला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. भावाच्या जागेवर मतदान करण्यासाठी हा मतदार आल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा




















