Nagpur Teachers Constituency Elections : 'नॉट रीचेबल' उमेदवार इटकेलवार यांचे राष्ट्रवादीतून तात्काळ निलंबन
Nagpur Teachers Constituency Elections : अर्ज मागे घेण्याची दुपारी 3 पर्यंतच मुदत होती, मात्र इटकेलवार हे 'नॉट रीचेबल' होते. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली.
Teachers Constituency Elections Nagpur : नागपूर शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार हे अर्ज मागे घेणार असे सांगण्यात येत होते. आज दुपारी तीनपर्यंतच अर्ज मागे घेण्याची मुदत होती, तरी सतीश इटकेलवार हे 'नॉट रीचेबल' होते. मात्र त्यांच्या या कृतीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तात्काळ प्रभावाने त्यांचे निलंबन केले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे (Duneshwar Pethe) यांनी दिली.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक म्हणजे अनिश्चिततेचा खेळ होऊन बसली आहे. कॉंग्रेसचा उमेदवार कोण किंवा पाठिंबा कुणाला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. असे असताना सतीश इटकेलवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणुकीच्या रणधुमाळीत धूम उडवून दिली होती. 'या निवडणुकीची तयारी आजची नाही, तर गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. माझी दावेदारी म्हणजे आमच्या पक्षाचे मन वळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. कारण मला जवळपास सर्व संघटनांचे समर्थन मिळाले आहे. संघटनांच्या प्रमुखांनी जरी सांगितले नसले, तरी त्यांच्या लोकांनी ही निवडणूक लढवण्यासाठी मला सांगितले आहे,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली होती.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसह नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कधी नव्हे असे एका पाठोपाठ ट्विस्ट आले. शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठिंबा मिळविलेल्या उमेदवार शुभांगी पाटील या आज सकाळपासून नॉट रिचेबल होत्या. त्यामुळे पुन्हा एक ट्विस्ट या निवडणुकीत आला आहे. इकडे नागपुरातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सतीश ईटकेलवार हे माघार घेतील, अशी चर्चा असताना ते सुद्धा नॉट रिचेबल असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिली. मात्र त्याच्या या व्यवहारामुळे त्यांचे तत्काळ निलंबन करण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आहे.
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचीही भूमिका स्पष्ट
नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चार ते पाच प्रमुख उमेदवार लढत आहेत. यात चंद्रपूर जिल्ह्यातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचाही समावेश आहे. चंद्रपूर शहराचा आमदार म्हणून माझी भूमिका त्यात निर्णायक आहे, असे लोकांना वाटत आहे, पण तसे काहीही नाहीये, असे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
ही बातमी देखील वाचा...