नागपुरात गुंडांचा धुडगूस; दोन डझन गाड्यांची तोडफोड, एक कार जाळली!
नागपुरात गावगुंडांनी गुरुवारी मध्यरात्री अक्षरश: हैदोस घातला. गुंडांनी दोन डझन कार फोडल्या, तर एक कार जाळली. 4 ते 5 किमीच्या परिसरात गुंड दोन तास धुडगूस घालून नुकसान करत असताना पोलीस कुठे होते, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
![नागपुरात गुंडांचा धुडगूस; दोन डझन गाड्यांची तोडफोड, एक कार जाळली! Goons creates ruckus at Nagpur, two dozens of cars vandalized and set ablaze नागपुरात गुंडांचा धुडगूस; दोन डझन गाड्यांची तोडफोड, एक कार जाळली!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/30155119/Nagpur-Goons-Ruckus.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपूरची क्राईम कॅपिटल ही ओळख पुसली गेली असा दावा जरी गृहमंत्री अनिल देशमुख करत असले, तरी उपराजधानीत गुन्हेगारांचं थैमान मात्र अजून सुरुच आहे. नागपुरात गुरुवारी (29 ऑक्टोबर) पहाटेच काही गावगुंडांनी नरेंद्रनगर आणि आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये दोन डझन कारची तोडफोड करत नागरिकांचं मोठं नुकसान केला आहे. तर या गुंडांनी एक कार देखील पेटवून दिली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातील नागरिक दहशतीत आहे. गेल्या काही दिवसात नागपुरातील गुन्हेगारीच्या घटना पाहता शहरात गुंडाराज असल्याचं चित्र आहे.
गृहमंत्र्यांच्या नागपुरात गावगुंडाचा हा असा हैदोस सुरु आहे. शहरातील उच्चशिक्षितांची आणि नोकरदार वर्गाची वस्ती असलेल्या नरेंद्रनगर आणि जवळपासच्या बोरकुटे ले आऊट, पीएमजी कॉलनी, नवजीवन कॉलनी अशा अनेक वस्त्यांमध्ये तसेच तिथून अनेक किलोमीटर लांब रमानगर परिसरात गावगुंडांनी गुरुवारी रात्री अडीच ते पहाटे साडेचारपर्यंत अक्षरक्ष: हैदोस घातला. एक-दोन डझन महागड्या कार एकतर फोडल्या किंवा आगीच्या हवाली केल्या. बोरकुटे लेआऊटमध्ये राऊत कुटुंबियांची फोर्ड फिगो कार पेटवताना तिघे गुंड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दुचाकीवरुन आलेले तीन गुंड एका कारवर पेट्रोल टाकत आणि मग पेटवून देत असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
ज्या नरेंद्र नगर परिसरात गुंडांनी हे हैदोस घातले त्या भागात नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. या तोडफोडीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान तर झालेच आहे. शिवाय या घटनेनंतर नागरिक दहशतीतही आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी ते करत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे गुंडांनी पहिली कार रात्री अडीच वाजता फोडल्याची माहिती आहे आणि अखेरची कार त्यांनी चार वाजून 20 मिनिटांनी जाळली आहे. त्यामुळे गाव गुंड दोन तास धुडगूस घालत असताना पोलिसांची गस्त कुठे होती असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दरम्यान, नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणल्याचा दावा गृहमंत्री करतात. मात्र, दर दोन-तीन दिवसांनी होणाऱ्या हत्या, घरफोडी आणि बलात्काराच्या घटना नागपूर पोलिसांची तसेच गृहमंत्र्यांच्या दाव्याची पोलखोल करत आहे. गुरुवारी पहाटेचा गुंडांचा धुडगूस तर नागपुरात राज्य नेमकं कायद्याचं आहे की गुंडांचं असा दुर्दैवी प्रश्न ही निर्माण करणारा आहे.
Nagpur Ruckus | नागपुरात गुंडांचा हैदोस, 20 पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड, काही वाहनं जाळलीमहत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)