Nagpur to Goa Train : गोव्याला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; नागपूर-मडगाव स्पेशल एक्सप्रेस जुलैपर्यंत
Nagpur to Goa : नागपूर-मडगाव गाड्यांच्या वेळेत, थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. याचे आरक्षण कालपासून सुरू झाले असल्याने नागपूर ते गोवा पर्यटनासाठी जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Nagpur Railway Station : होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नागपूर-मडगाव-नागपूर या विशेष रेल्वेगाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेगाड्या जुलै महिन्यापर्यंत चालविण्यात येणार आहेत. होळीत आणि उन्हाळ्याच्या सुट्या घालविण्यासाठी अनेकजण कुटुंबासह गोव्याला जातात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गोव्याला जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरक्षणाला सुरुवात
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत धावणारी रेल्वेगाडी क्रमांक 01139 नागपूर-मडगाव (Nagpur Train) द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 1 जुलै 2023 पर्यंत आणि 26 फेब्रुवारीपर्यंत धावणारी रेल्वेगाडी क्रमांक 01140 मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 2 जुलैपर्यंत चालविण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्यांच्या वेळेत, थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही रेल्वेगाड्यांचे आरक्षण 22 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच
मध्य रेल्वेच्या पूणे विभागात सातारा आणि कोरेगाव सेक्शनमध्ये डबलिंगसाठी 28 फेब्रुवारीला नॉन- इंटरलॉकिंगचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून, महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यालाच संपणार आणि तेथूनच धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, रेल्वेगाडी क्रमांक 11040 गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस 27 फेब्रुवारीला कोल्हापूरऐवजी पुणे रेल्वे स्थानकापर्यंतच धावणार आहे, तर रेल्वेगाडी क्रमांक 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 28 फेब्रुवारीला कोल्हापूरऐवजी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दुरांतो एक्स्प्रेस तासभराने उशिरा
मुंबईला जाणारी दुरांतो एक्स्प्रेस काल, बुधवारी तासभराने उशिरा सुटल्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना ताटकळत बसून राहावे लागले. रेल्वेगाडी क्रमांक 12290 नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस नियमित वेळेनुसार रात्री 8:40 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून सुटते. परंतु बुधवारी रात्री 9.30 वाजल्यानंतरही ही गाडी प्लॅटफॉर्मवर लागली नसल्यामुळे ही गाडी रद्द करण्यात आली की काय असे, प्रवाशांना वाटले. गाडीची वाट पाहून प्रवासी वैतागले होते. थोड्या वेळातच ही गाडी 9:40 ला प्लॅटफॉर्मवर लागली आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे नागपूर-मुंबई, नागपूर पुणे यासह विविध गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले असून यासह नागपूर हैद्राबाद आदी मार्गावर गरजेनुसार विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात याव्या अशी मागणी नागपूर रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.