नागनृत्य करुन कोरोनावरील उपचाराच्या नावाखाली आर्थिक लूट, नागपुरात भोंदूबाबाचा पर्दाफाश
चक्क नागनृत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह बनवण्याचा दावा करणाऱ्या नागपुरातील भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. अंगात नागराज अवतरले आहे असा बनाव करायचा. या माध्यमातून गरीब कोरोनाबाधित रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांवर प्रभाव पाडायचा.

नागपूर : कोरोना संकटाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारे जेवढे आहेत, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने रुग्णांना त्यांच्या अडचणीचा फायदा घेत लुबाडणारे सध्या दिसून येत आहेत. नागपुरात अशाच एका भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. शुभम तायडे नावाचा हा बाबा कोरोना दूर करण्याचा दावा करत लोकांना लुबाडत होता. अंगामध्ये चक्क नागराज अवतरतात अशी थाप मारून तो लोकांना मूर्ख बनवत होता.
एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत एकात्मतानगरमधील त्याच्या घरी कोरोनाची बाधा दूर करुन घेण्यासाठी रोज अनेक लोक यायचे. त्यांच्यासमोरच शुभम त्याच्या अंगात नागराज अवतरले आहेत, असा बनाव करायचा. तोंडातून सापाचा आवाज काढत जोरजोरात नृत्य करायचा, जमिनीवर आदळआपट करायचा आणि त्या माध्यमातून गरीब कोरोना बाधित रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांवर प्रभाव निर्माण करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शुभम अवघ्या 21 वर्षांचा असून त्याने गेल्या अनेक दिवसांपासून ही बनवाबनवी सुरु केली होती. रुग्णांसमोर नाग नृत्य केल्यानंतर तो एक विभूतीसारखं औषध खायला द्यायचा, त्याच्या मोबदल्यात तो रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम घ्यायचा. धक्कादायक म्हणजे नागपुरात लॉकडाऊन असतानाही एकात्मता नगरमधील शुभम तायडे यांच्या घरी भरणाऱ्या दरबारात रोज मोठ्या संख्येने लोकं यायचे.
ही बाब अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी काल (14) शुभम तायडेच्या घरी जाऊन आधी सर्व बाबी तपासल्या, आणि त्याच्याविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा कायदा, 2013 अन्वये कारवाई सुरु करत शुभम तायडेला नोटीस दिली आहे. त्याची आरोग्य तपासणी केल्यानंतर लवकरच त्याला अटक होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
