Nagpur Gram Panchayat Results : उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात कुणाचा डंका? कॉंग्रेस-भाजपचे प्रत्येकी सहा ग्रामपंचायतींवर सरपंच
काँग्रेसचे आमदार राजू पारवेंच्या प्रभावात गेल्या 3 वर्षात कुही आणि भिवापूर तालुक्यातील बहुतांशी निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळत होतं. मात्र यंदा भाजपने काही अंशी या दोन तालुक्यात मुसंडी मारली आहे.
Nagpur News : नागपूर जिल्ह्यात 15 ग्रामपंचायतीसाठी काल झालेल्या मतदानात ग्रामीण मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. सहा ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे (Congress) सरपंच निवडून आले आहेत तर सहा ठिकाणी भाजपचे सरपंच विजयी झाले आहे. एका ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सरपंचपदी यश मिळालं आहे. तर दोन ग्रामपंचायतींमध्ये अपक्ष सरपंच निवडून आले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील एकूण 17 ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Elections) निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी रामटेक (Ramtek) तालुक्यातील दोन ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित 15 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाले.
उमरेड विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये भाजपची मुसंडी
नागपूर जिल्ह्यात ज्या 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यापैकी 14 ग्रामपंचायती उमरेड विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कुही आणि भिवापूर तालुक्यातील आहेत. उमरेड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार काँग्रेसचे राजू पारवे (MLA Raju Parwe) असून त्यांच्या प्रभावाने गेल्या तीन वर्षात कुही आणि भिवापूर तालुक्यात झालेल्या बहुतांशी निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळत होतं. मात्र यंदा भाजपने (BJP) काही अंशी या दोन तालुक्यात मुसंडी मारली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार राजू पारवे यांच्यासाठी हा धक्काच म्हणावा लागेल.
प्रकल्पग्रस्तांकडे केलेले दुर्लक्ष भोवले
कुही आणि भिवापूर तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. त्या बहुतांशी गोसीखुर्द प्रकल्पामुळे (Gosi Khurd Irrigation Project) बाधित असलेले किंवा पुनर्वसित झालेले गाव आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींकडे विद्यमान आमदारांनी हवं तसं लक्ष घातलं नाही, त्याचा हा परिणाम आहे का अशी चर्चाही या निकालानंतर सुरू झाली आहे.
ही बातमी देखील वाचा-