(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Central Jail : आई-वडिलांना भेटून मुलांचे चेहरे फुलले; मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची गळाभेट
Nagpur News : तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या गुन्ह्याची शिक्षा कुटुंब, मुलांनाही मिळते. तुरुंगात बंद आई-वडिलांशी मुलं भेटू शकत नाही. त्यामुळे कैद्यांच्या मुलांना आपल्या पालकांना भेटण्याची संधी देण्यात आली.
Nagpur News : आधुनिक काळात कारागृह केवळ कैद्यांना बंदी बनवून ठेवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. कैद्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासोबतच त्यांच्या पुनर्वसनाचे कामही कारागृहात होत आहे. कैद्यांचे वर्तन सुधारणे आणि स्वयंरोजगारासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मुलांची कारागृहात बंद त्यांच्या आई-वडिलांशी गळाभेट घालून देण्याचा उपक्रमही यापैकीच एक आहे.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) असे अनेक कैदी आहेत ज्यांनी रागात येऊन गुन्हा केला. आता ते आपलं आयुष्य तुरुंगात घालवत आहेत. ना कुटुंबाला भेटण्याची संधी मिळत आणि ना मुलांचा चेहरा पाहायला मिळत. अनेकदा या कैद्यांची पॅरोल आणि फर्लो रजा रद्द होते. त्यामुळे त्यांना कुटुंबाशी भेटण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे बहुतांश कैदी निराश होतात. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा कुटुंब आणि मुलांनाही मिळते. तुरुंगात बंद असलेल्या आई-वडिलांना ते भेटू शकत नाहीत. त्यामुळे कैद्यांच्या मुलांना कारागृह विभागाकडून आपल्या पालकांना भेटण्याची संधी दिली गेली. या अंतर्गत कारागृहात कैद्यांच्या मुलांसाठी गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव जयदीप पांडे यांनी केली.
मुलांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन तुरुंगात बंद कैद्यांच्याच तीन मुलांच्या हस्ते करण्यात आले. कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी पाहुण्यांना कार्यक्रमाची माहिती दिली. गळाभेट कार्यक्रमासाठी 109 कैद्यांनी नावाची नोंदणी केली होती. त्यातील 72 कैद्यांच्या 103 मुलांना पालकांशी भेटण्याची संधी मिळाली. काही कैद्यांच्या चेहऱ्यावर दु:ख झळकले, ज्यांची मुले त्यांना भेटायला आले नव्हते. कैद्यांनी कारागृहात मिळणाऱ्या मजुरीच्या पैशातून मुलांसाठी खाऊ घेतलेला होता. कारागृह प्रशासनाने मुलांना पुरी-भाजी खाऊ घालून केळी आणि बिस्किटही दिले. अनेक दिवसातून झालेल्या भेटीसाठी अर्धा तास खूपच कमी होता. पाणावलेल्या डोळ्यांनी मुले आणि आई-वडिलांनी एकमेकांचा निरोप घेतला. कार्यक्रमाला उपअधीक्षक दीपा आगे, वरिष्ठ कारागृह अधिकारी आनंद पानसरे, वामन निमजे, नरेंद्रकुमार अहिरे, दीपक भोसले, भगवान मंचरे, माया धुतुरे, संजीव हटवादे, समाजसेवक कृष्णा पाडवी, धनपाल मेश्राम, प्रमोद वासनिक, मीना लाटकर, जेवण व्यवस्थापक संजय कोवे, श्रीकांत उपगणलावार, हवालदार संजय तलवारे, संजय गायकवाड, किशोर पडाल, सुधीर दिघीकर आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
ही बातमी देखील वाचा