Nagpur : जिल्ह्यातील प्रत्येक सातबारावर पुरुषांसोबत स्त्रीचेही नाव आणा, 'लक्ष्मी मुक्ती योजने'ला सुरुवात
शेतकरी बांधवांना जर त्यांची जमीन स्वखुशीने त्यांच्या पत्नीच्या नावाने करायची असेल तर लक्ष्मी मुक्ती योजना च्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या नावाची जमीन पत्नीच्या नावाने पती हयात असताना करू शकतात.

नागपूर : जिल्ह्यातल्या प्रत्येक सातबारावर पुरुषांसोबत स्त्रीचे नाव आलेच पाहिजे. यासाठी मतपरिवर्तन करून प्रयत्न करण्याची गरज आहे. नागरिकांचा दृष्टीकोण बदलण्यासाठी पुढाकार घ्या. लोकांमध्ये जनजागृती करा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आपल्या छोटेखानी भाषणामध्ये त्यांनी आपल्या मिळकतीला, स्थावर मालमत्तेला आपल्यानंतर याच ठिकाणी ठेवून जावे लागते. मात्र मागे राहणाऱ्यांच्या नावाने विशेषता घरातल्या महिलांच्या नावाने मालकी असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे माहिलांची नावे नोंदविणे ऐच्छिक असणारा विषय जिल्ह्यामध्ये मतपरिवर्तनातून अनिवार्य होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवा
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी महसूल कर्मचाऱ्यांनी जबाबदारी काय असते हे जिल्ह्यावर येणाऱ्या संकटांच्या वेळी, निवडणुकांच्या वेळी सिद्ध केलेले असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांबाबत लोकांमध्ये प्रचंड विश्वास आहे. बदलत्या डिजिटल युगात आता जनतेला आपल्याकडून आणखी जबाबदारीची, पारदर्शितेची व गतीशिलतेची अपेक्षा आहे. त्यानुसार बदल स्वतःमध्ये करावा. तेव्हाच आपली सर्वमान्यता व प्रशासनातीत अग्रणी भूमिका कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्कष्ट कामगिरीबद्दल गौरव
यावेळी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, उपजिल्हाधिकारी नागपूर हेमा बडे, तहसीलदार संजय गांधी निराधार योजना मनपा क्षेत्राच्या चैताली सावंत, कळमेश्वरचे तहसीलदार सचिन यादव , उमरेडचे नायब तहसीलदार टी. डी. लांजेवार, उच्च श्रेणी लघुलेखक संजय गिरी जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, राहुल भुजाडे मंडल अधिकारी तहसील कार्यालय मौदा. शेख मुजीब शेख जमील अव्वल कारकून तहसील कार्यालय नरखेड, अमोल कुमार पौळ महसूल सहाय्यक तहसील कार्यालय कामठी, रूपाली तायवाडे तहसील, नागपूर ग्रामीण, अनिल सव्वालाखे तलाठी तहसील कार्यालय हिंगणा, राजू निळकंठ मुनघाटे वाहन चालक उपविभागीय अधिकारी कार्यालय सावनेर, मोरेश्वर उताणे पोलीस पाटील तहसील कार्यालय काटोल, विजय एम्बडवार कोतवाल तहसील कार्यालय उमरेड यांना सन्मानित करण्यात आले.
काय आहे लक्ष्मी मुक्ती योजना?
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जर त्यांची जमीन स्वखुशीने त्यांच्या पत्नीच्या नावाने करायची असेल तर लक्ष्मी मुक्ती योजना च्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या नावाची जमीन पत्नीच्या नावाने पती हयात असताना करू शकतात. जर एकाध्या महिलेला तिच्या पतीच्या नावाने असलेली जमीन तिच्या स्वताच्या नावाने करून पाहिजे असेल तर लक्ष्मी मुक्ती योजना च्या साहाय्याने ती तिच्या पतीच्या नावाने असलेली जमीन तिच्या स्वताच्या नावाने करून घेऊ शकते. जर महिलेच्या पतीला स्वखुशीने तो हयात असताना त्याच्या नावाने असलेल्या जमिनीवर तेच्या पत्नीला सह हिस्सेदारी मिळवून द्यायची असेल तर तो लक्ष्मी मुक्ती योजना च्या माध्यमातून त्याच्या जमिनीत तो हयात असताना त्याच्या पत्नीला हिस्सेदारी मिळवून देऊ शकतो.























