Nagpur : नागपुरात ड्रग्स विरोधात लढणार 'पोलीस काका'; तरुणाईमध्ये अमली पदार्थाचा वापर रोखण्याकरता पोलिसांचा अभिनव उपक्रम
Drugs : नागपुरातील तरुणाईमध्ये अमली पदार्थाचा वाढता वापर लक्षात घेता पोलिसांनी "पोलीस काका" ही नवी मोहीम सुरू केली आहे. "पोलीस दीदी" नंतर आता "पोलीस काका" गुन्हेगारांच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत.
नागपूर: शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांना नेहमीच आदरापोटी "पोलीस काका" असे संबोधतात. आता नागपूर पोलिसांनी शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनातील त्याच पोलीस काकांना अमली पदार्थ विरोधी लढ्यात उतरवले आहे. किशोरवयीन मुले आणि महाविद्यालयीन तरुणांमध्ये अमली पदार्थांचा वाढता वापर आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्य तसेच मानसिकतेवर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी "पोलीस काका" ही नवी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन मधून चार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालय, तरुणांचे संघटन तसेच गणेशोत्सव आणि नवरात्र मंडळ यांना संपर्क साधून अमली पदार्था विरोधात जागृती करतील.
नागपुरात अमली पदार्थांचा विळखा घट्ट होतो आहे?
नागपूर पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक सतत अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात कारवाया करते. मात्र तरीही एक आरोपी तुरुंगात जाताच दुसरा आरोपी त्याच्या जागी अमली पदार्थांच्या व्यवसायात उतरतो. कारण तरुणाईमधून अमली पदार्थांची मागणी जास्त आहे. नागपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे वर्ष 2022 च्या जानेवारी ते जुलै या सात महिन्यातच अमली पदार्थांच्या साठवण, सेवन आणि विक्रीचे 113 प्रकरण दाखल झाले आहे. त्यामध्ये नागपूर पोलिसांनी 1 कोटी 15 लाख रुपयांचे 395 किलो अमली पदार्थ जप्त केले आहे. त्यामध्ये गांजा, ब्राऊन शुगर, चरस, कोकेन, एमडी अशा विविध अमली पदार्थांचा समावेश आहे. या सर्व कारवायांमध्ये 172 आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र तरीही अमली पदार्थांची तस्करी काही केल्या थांबत नाही आहे. त्यामुळे आता तरुणाईला जागृत करत अमली पदार्थांचा वापरावरच घाला घालण्याचे नागपूर पोलिसांनी ठरवले आहे. त्यासाठी "पोलीस काका" ही अभिनव योजना सुरु झाली आहे.
"पोलीस काका" नेमकं काय करणार
शाळकरी मुले किंवा महाविद्यालयीन तरुण फक्त स्टेटस म्हणून किंवा मित्रांसमोर आपला बडेजाव दाखवण्यासाठी धुम्रपान किंवा कुठल्या तरी स्वस्त अमली पदार्थांचा वापर सुरु करतात. मात्र, भविष्यात या अमली पदार्थाची सवय त्यांच्याच आरोग्यावर काय दुष्परिणाम घडवेल याची जाणीव त्यांना नसते. म्हणजेच अमली पदार्थांची सवय दुष्परिणामांचा माहितीच्या अभावी जडते आणि काही काळानंतर अमली पदार्थांचे सेवन मजबुरी बनून जाते. नागपूर पोलिसांनी सुरु केलेल्या "पोलीस काका" योजनेतील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयात जाऊन अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणार आहे.
धुम्रपान असो किंवा कोणत्या तरी अमली पदार्थाचा सेवन असो त्यास पहिल्यांदा नकार देणे म्हणजेच नेहमी नाकारणे आहे. एकदा तुम्ही त्यापासून दूर राहू शकला तर आयुष्यभर त्या वाईट सवयींपासून दूर राहू शकाल हे किशोर आणि तरुण वयातच त्यांच्या मनात खोलवर रुजवण्याचा नागपूर पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे. शाळा महाविद्यालयासह परिसरातील तरुण मंडळे, गणेशोत्सव आणि नवरात्र मंडळ हेही पोलीस काकांच्या कार्यक्षेत्राचा भाग असणार आहे. एवढेच नाही तर पोलीस काका त्यांच्या कार्यक्षेत्रातील अमली पदार्थांच्या तस्करांवर नजर ठेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी ही दक्ष राहणार आहे.
अमली पदार्थ आणि नागपूरच्या गुन्हेगारीचे थेट संबंध आहे का?
अमली पदार्थाच्या वापरामुळे आरोग्यावर, मानसिकतेवर अत्यंत भयावह परिणाम होतात. जो व्यक्ती अमली पदार्थांच्या आहारी जातो त्याला त्याचे कुटुंबीय, मित्र आणि शेजारी नशेडी म्हणून हिणवतात. या अवहेलनेमुळे अमली पदार्थांच्या आहारी गेलेला व्यक्ती त्यांचा आणखी नशा करायला लागतो. त्यामुळे अमली पदार्थांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम माहित असून ही त्यांच्या सेवनाची मालिका खंडित होत नाही. एवढेच नाही तर अमली पदार्थांच्या सेवनासाठी सोप्यारित्या पैशांची जुडवा जुडव करण्यासाठी अनेक जण गुन्हे ही करतात. नागपुरात चेन स्नॅचिंग पासून रस्त्यावर घडणाऱ्या वाटमाऱ्या, चोरी आणि घरफोडीच्या प्रकारामागे अमली पदार्थांच्या अधीन असलेले आरोपी असल्याचे अनेक वेळेला समोर आले आहे. हत्येच्या काही प्रकरणामागे अल्पवयीन गुन्हेगारांच्या सहभागाचा जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा अल्पवयीन आरोपींची अमली पदार्थांचे सेवन करून हत्येच्या घटना घडवल्याचे समोर आले. अनेक सराईत गुन्हेगार अल्पवयीन आरोपींकडून गंभीर गुन्हे घडवण्यासाठी जाणून बुजून त्यांना अमली पदार्थांची सवय लावतात हे ही अनेक प्रकरणात समोर आले आहे. त्यामुळे नागपुरात अमली पदार्थांच्या वापरामुळे जास्त गुन्हे घडण्याचे थेट संबंध आहे.
"पोलीस दीदी" योजनेच्या यशानंतरच "पोलीस काका" योजना
काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या सह पोलीस आयुक्त अस्वती दोर्जे यांच्या संकल्पनेतून "पोलीस दीदी" ही योजना राबवण्यात आली होती. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांच्या छेडखानीच्या घटनांना आळा बसवण्यासाठी त्याचा मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. पोलीस दीदी योजनेच्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी विद्यार्थिनी गूड टच, बॅड टचबद्दल माहिती दिली होती. यासह छेडखानीच्या घटना होत असताना कोणाला माहिती द्यावी. त्याला कसे सामोरे जावे याबद्दल ही माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली होती.
पोलीस काका योजनेतील अधिकारी, कर्मचारी यांना खास प्रशिक्षण
"पोलीस काका" या पथकासाठी निवडलेल्या निवडक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. नावाजलेले व्यसनमुक्ती सल्लागार बॉस्को डिसुझा यांनी नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन मधून निवडलेल्या 135 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. भविष्यात वेळोवेळी मानसोपचार तज्ञ आणि वैद्यकीय तज्ञ ही पोलीस काका पथकाला प्रशिक्षण देणार आहे. पोलीस काकांच्या प्रशिक्षणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त अस्वती दोर्जे हे स्वतः उपस्थित होते.