(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाना पटोले यांनी मानसिक उपचार करून घ्यावेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
नागपूर : "नाना पटोले यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार आहे. बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आणि रोज काँग्रेसची प्रतिमा मलिन करणाऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी ठेवू नये अशी विनंती या पत्रातून करणार आहे. यापूर्वीही राज्यात वध आणि हत्या या मुद्द्यावर मोठा गदारोळ झाला आहे. त्यामुळे पटोले यांनी असे वक्तव्य करू नये. नाना पटोले यांनी मानसिक उपचार करून घ्यावेत, अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. महात्मा गांधी यांच्याबद्दल नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. त्यासोबतच संजय याऊत यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "युतीचे सरकार असताना महाराष्ट्राच्या अनेक लोकप्रतिनिधींनी (त्यामध्ये शिवसेनेचेही अनेक लोकप्रतिनिधी होते) घरपोच मद्यविक्री सुरू करावी आणि त्यासाठी एक्साईज आकारावा अशी मागणी केली होती. परंतु, तो प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मिनिटात फेटाळून लावला होता. परवा संजय राऊत म्हणाले की, मागच्या सरकारच्या वेळेला असा प्रस्ताव आला होता. परंतु, मागचे सरकार भाजप-सेनेचे नव्हते का? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित केला.
"या सरकारने किराणा दुकानातून वाईन विक्री करण्याचे जे पाप केले आहे, ते पाप लपवण्यासाठी तुम्ही मागच्या युती सरकारवर आरोप करत आहात. संजय राऊत सध्या बावचळले आहेत. त्यांना काय बोलावं आणि कसं बोलावं याचं भान राहिलेलं नाही, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर केला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "कोणत्या लोकप्रतिनिधींनी तेव्हा घरपोच मध्य विक्री करण्याच्या परवानगी संदर्भात प्रस्ताव दिला होता त्यांचे नाव आता सांगता येणार नाही. परंतु, असे अनेक लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव होते. मात्र आम्ही हे प्रस्ताव फेटाळून लावले. वायनरीमध्ये कोण-कोण व्यवसायिक आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. विंचूरपर्यंत कोण वायनरी मालक आहेत? त्यांची वाइन कुठे जाते? हे सर्वांना माहीत आहे."
अनिल देशमुख यांना कोणाचा आशीर्वाद?
"सीताराम कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख सल्लागार आहेत. त्यांनी ईडी समोर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेबद्दल जे मत व्यक्त केले, ते गंभीर आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. परंतु, सीताराम कुंटे यांनी त्या वेळी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात कोणाला कुठे पोस्टिंग द्यायची? याची नावासह यादी पाठवत होते, अशी माहिती ईडीला दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना त्यावेळी कोणाचा आशीर्वाद होता? हे समोर आलं पाहिजे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या