(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : क्रीडा महर्षी पुरस्कार सोहळ्याला ग्रेट खलीची उपस्थिती, नितीन गडकरींनी केल्या महत्वाच्या घोषणा
खासदार क्रीडा महोत्सवात यंदाचा क्रीडा महर्षी पुरस्कार द्रोणाचार्य आणि छत्रपती पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.
Khasdar Krida Mahotsav : खासदार क्रीडा महोत्सव नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरले आहे. मागील 13 दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाचा उद्या, रविवारी 22 जानेवारी रोजी समारोप होत आहे. यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी क्रीडा महर्षी पुरस्कार देण्यात येतो. खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वाचा क्रीडा महर्षी पुरस्कार द्रोणाचार्य आणि छत्रपती पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी घोषणा खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वातील आयोजन आणि समारोपीय कार्यक्रमाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी क्रीडा महर्षी पुरस्कार विजेत्यांचे नाव जाहीर केले. खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्या, रविवारी 22 जानेवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे सायंकाळी 5.30 वाजता समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
पाच लक्ष रुपये अन् स्मृती चिन्ह
या कार्यक्रमात क्रीडा महर्षी आणि क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायक अंकित तिवारी यांचे लाईव्ह कॉन्सर्ट आणि डब्ल्यूडब्ल्यूई मधील वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन ग्रेट खली यांची विशेष उपस्थिती असेल, अशीही माहिती यावेळी नितीन गडकरी यांनी दिली. खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी एका व्यक्तीला क्रीडा महर्षी पुरस्काराने गौरविण्यात येते. 5 लक्ष रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी ज्येष्ठ क्रीडा संघटक नागपूर शहराचे माजी महापौर दिवंगत सरदार अटल बहादूर सिंग, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर, ज्येष्ठ क्रीडा संघटक भाउ काणे आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक धनवटे नॅशनल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांना आतापर्यंत क्रीडा महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदा द्रोणाचार्य आणि छत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ क्रीडा संघटक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय मुनीश्वर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय दरवर्षी विविध संघटनांच्या खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 25 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. क्रीडा भूषण पुरस्कारासाठी विविध संघटनांकडून खेळाडूंचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार खेळाडूंची कामगिरी लक्षात घेउन पारदर्शी पद्धतीने पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी नमूद केले.
क्रीडा भूषण पुरस्कार विजेते
1. प्रिया चावजी (तिरंदाजी)
2. सायली वाघमारे (ॲथलेटिक्स)
3. प्राची राजू गोडबोले (मॅरेथॉन)
4. फैजान पठाण (खो-खो)
5. मोहनीश मेश्राम (कॅरम)
6. श्रुती जोशी (तलवारबाजी)
7. छकुली सेलोकर (योगासन)
8. अंकुश घाटे (आट्यापाट्या)
9. अभिषेक सेलोकर (सॉफ्टबॉल)
10. प्रज्ज्वल पंचबुधे (मलखांब)
11. जावेद अख्तर (फुटबॉल)
12. हर्षा खडसे (कबड्डी)
13. ईशिता कापटा (ज्यूडो)
14. घारा अनंत फाटे (बास्केटबॉल)
15. जयेंद्र ढोले (बॅडमिंटन)
16. निलेश मत्ते (व्हॉलिबॉल)
17. अनिल पांडे (रायफल शूटिंग)
18. आदी सुधीर चिटणीस (टेबल टेनिस)
19. निखिलेश तभाने (स्केटिंग)
20. यश गुल्हाणे (जलतरण)
21. सचिन पाटील (लॉन टेनिस)
22. रोशनी प्रकाश रिंके (दिव्यांग)
23. अंशिता मनोहरे (कुस्ती)
ही बातमी देखील वाचा...