मुंबईत नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू
मुंबईतील कुर्ला परिसरात नाल्यात पडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास ही घटना घटली.
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात नाल्यात पडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास ही घटना घटली. मृत्यू झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण कुर्ला परिसरात रात्रीच्या वेळी फिरत होता. मात्र अंधारात नाला न दिसल्याने तो नाल्यात पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी तरुणास नाल्यातून बाहेर काढलं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटना नेमकी कशी घटली याचा तपास पोलिस करत आहे.
काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरातली एका २ वर्षीय चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू झाला होता. चेंबूरच्या चिता कॅम्प परिसरात ही घटना घडली होती. त्यामुळे मुंबईतील उघडे नाले आणि उघडे मॅनहोल यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात नाले आणि रस्ता यांच्यातील फरक ओळखणे अनेकदा कठीण बनते. नागरिकांसाठी जीवघेणी ठरते.