एक्स्प्लोर
युतीच्या काडीमोडनंतर उमेदवारीसाठी सर्वपक्षीय मातोश्रीवर

मुंबई : शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर 227 जागांवर उमेदवारी मिळवण्यासाठी मातोश्रीवर झुंबड उडाली आहे. फक्त शिवसैनिकच नाहीत सर्वपक्षीयांनी शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी रांग लावली आहे. शीख आणि मुस्लिम बहुल भागात शिवसेनेच्या तिकीटावर उभं राहण्यासाठी सर्वधर्मीयांची मातोश्रीवर गर्दी झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मालाड पश्चिमचे काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि गुरुदास कामत यांचे कट्टर समर्थक असलेले बलदेवसिंग मानको (बिल्लाजी) यांचा प्रबलीन कौर मानको या आपल्या मुलीसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला. समाजवादी पक्षाच्या मुंबई युवा विंगच्या अध्यक्षा आणि अबू आजमी यांची निकटवर्तीय असलेल्या नेहा खान यांचाही मुस्लिम तरुणांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. ‘राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार’ अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. प्रजासत्ताक दिनी गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगणार आहे. ‘गेली 25 वर्ष शिवसेना युतीत सडली. पण आता ही फरफट होणार नाही. तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतो आहे की, आता यापुढे शिवसेना महाराष्ट्रात भगवा फडकवेल. कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरं घेऊन जाणार नाही. महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपशी काडीमोड घेतल्याचं जाहीर केलं.
आणखी वाचा























