(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रत्येक मतदान केंद्रावर रुग्णवाहिका न ठेवता, गरजेनुसार वैद्यकीय सेवा पुरवली जाईल; केंद्रीय निवडणूक आयोगाची हायकोर्टात हमी
अनेकदा निवडणुकीच्या कामामुळे प्रकृती गंभीर होऊन मृत्यु झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
मुंबई : प्रत्येक मतदान केंद्रावर रुग्णवाहिका ठेवण्याची गरज नाही, अशी भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केली आहे. गरजेनुसार मतदान केंद्रांवर प्राथमिक उपचार साहित्य आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध केली जाईल, अशी हमीही निवडणूक आयोगानं मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
मतदानाच्या दिवशी अनेक वेळा वृद्ध मतदार मतदान केंद्रावर येत असतात. तसेच कामाच्या ताणामुळे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची प्रकृतीही अनेकदा अस्वस्थ होते. कारण या कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटीदरम्यान किमान 15 ते 20 तास सलग काम करावं लागतं. यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होणे स्वाभाविक आहे.
अनेकदा निवडणुकीच्या कामामुळे प्रकृती गंभीर होऊन मृत्यु झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका वकील दिपक चट्टोपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली.
निवडणूक आयोगाच्यावतीनं प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा पुरवली जाते. प्रसंगी संबंधित रुग्ण मतदार किंवा कर्मचाऱ्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध केली जाते, असं आयोगाच्यावतीने सांगण्यात आलं. तसेच अगदीच तातडीची आवश्यकता असल्यास रुग्णवाहिकेऐवजी अन्य वाहनही तिथे उपलब्ध असतात, असं सांगण्यात आल्यानं याबाबत समाधान व्यक्त करुन हायकोर्टानं ही याचिका निकाली काढली.