'मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ठग!', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांविरोधात मनसेची पोस्टरबाजी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबईत आहेत. त्यांनी मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली होती. त्यांच्या याच कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. 'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली...' असं म्हणत मनसेनं निशाणा साधला आहे.
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी तसेच महाराष्ट्र आणि मुंबईतील उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडला न्यायचं आहे. त्यांच्या याच कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. 'अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला "ठग", 'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली...' अशा आशयाचे होर्डिंग मनसेकडून मुंबईत योगी आदित्यनाथ ज्या ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत, त्याच हॉटेलच्या खाली लावले आहेत. मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा "ठग" म्हटलंय. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्नं असल्याचंही त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटलंय. हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेरही लावण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ मुंबईत कलाकार, दिग्दर्शकांशी चर्चा करणार
होर्डिंगमध्ये काय म्हटलंय मनसेकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगमध्ये म्हटलंय की, 'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली...'. 'कुठे महाराष्ट्राचं वैभव...तर कुठे युपीचं दारिद्र...' 'भारतरत्नं दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं.' 'अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला "ठग".
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांच्या सरकारने नोएडामध्ये जागाही दिली असून बांधकामांचे काम वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी यांनी काल मुंबईमध्ये काही अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांची भेट घेतली. अभिनेता अक्षयकुमार देखील मुख्यमंत्री योगी यांना भेटला.
मुख्यमंत्री योगी स्वत: नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी आग्रही आहेत. उत्तर प्रदेशमध्ये उभारलेली फिल्म सिटी मुंबईहून कोणत्याही परिस्थितीत मागे राहू नये, म्हणून योगी आदित्यनाथ मुंबईतील बड्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या संपर्कात आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे योगी आदित्यनाथ स्वत: चित्रपटसृष्टी निर्मितीवर मंथन करत आहेत आणि अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत.
या उद्योजकांना भेटणार सीएम योगी आदित्यनाथ
सीएम योगी आदित्यनाथ आपल्या मुंबई दौऱ्यात एन चंद्राशेखरन चेअरमन टाटा सन्स, डॉ निरंजन हीरानंदानी चेअरमन हीरानंदानी ग्रुप, एसएन सुब्रमणयम, चेअरमन एलअॅंडटी, संजय नायर चेअरमन केकेआर इंडिया अॅडवायझर्स, सुप्रकाश चौधरी सीईओ सिमंस इंडस्ट्री, बाबा कल्याणी, चेअरमन भारत फोर्ज लिमिटेड, जसपाल बिंद्रा, चेअरमन सेंट्रम कॅपिटल लिमिटेड अमित नायर, व्हाईस प्रेसिडेंट वन 97 कम्यूनिकेशन्स, विकास जैन एके कॅपिटल सर्व्हिसेस, वरूण कौशिक असोशिएट डायरेक्टर एके कॅपिटल सर्व्हिसेस यांच्याशिवाय डिफेंस सेक्टरमधील प्रसिद्ध उद्योजक एसपी शुक्ल चेअरमन एफआयसीसीआय डिफेंस अॅंड एरोस्पेस कमेटी, सुकरन सिंह, सीईओ व एमडी टाटा अॅडवांस सिस्टम, सुशील कुमार एवीपी व हेड गर्व्हनमेंट इनोवेशन अॅंड स्किल डेवलपमेंट टाटा टेक्नोलॉजी, हर्षवर्धन गुणे हेड डिफेंस टाटा टेक्नोलॉजी, अशोक वाधवान चेअरमन पीएलआर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड, टीएस दरबारी, सीईओ व एमडी टॅक्समॅको डिफेंस सिस्टम, आशीष राजवंश हेड डिफेंस अडानी डिफेंस, रजत गुप्ता, हेड डिफेंस बिजनेस अशोक लेलॅंड, कर्नल आरएस भाटिया (रिटायर्ड), प्रेसिडेंट डिफेंस भारत फोर्ब, जेडी पाटील होल टाईम डायरेक्टर व मेंबर ऑफ बोर्ड एल अॅंड टी, विजय सुजान, सीईओ जेएनवी व्हेंचर्स इंडिया यांना योगी आदित्यनाथ भेटणार आहेत.