उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ मुंबईत कलाकार, दिग्दर्शकांशी चर्चा करणार
मुंबई फिल्म सिटीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ आज मुंबईत येऊन कलाकार, दिग्दर्शक यांच्याशी चर्चा करणार आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांच्या सरकारने नोएडामध्ये जागाही दिली असून बांधकामांचे काम वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आज मुंबईमध्ये काही अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांची भेट घेणार आहेत. यात अभिनेता अक्षयकुमारचीही भेट मुख्यमंत्री योगी येणार आहेत.
मुख्यमंत्री योगी स्वत: नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी आग्रही आहेत. उत्तर प्रदेशमध्ये उभारलेली फिल्म सिटी मुंबईहून कोणत्याही परिस्थितीत मागे राहू नये, म्हणून योगी आदित्यनाथ मुंबईतील बड्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या संपर्कात आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे योगी आदित्यनाथ स्वत: चित्रपटसृष्टी निर्मितीवर मंथन करत आहेत आणि अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत.
फिल्म सिटीमध्ये कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे हे समजून घेण्यासाठी सीएम योगी मुंबईला येत आहेत. मुंबईतील लोक उत्तर प्रदेशच्या फिल्म सिटीमध्ये काम करण्यासाठी येतील यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा सल्ला घेणार आहेत. यूपीमधील प्रस्तावित फिल्म सिटी संदर्भात मुख्यमंत्री आज बॉलिवूडमधील दिग्गजांशी बैठकीत चर्चा करणार आहेत. या बैठकीत ते यूपीमध्ये फिल्म सिटी बनवण्याच्या योजनांविषयी फिल्मी जगातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत.
केंद्राकडून मुंबईचे महत्व कमी करण्याची प्रयत्न : सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे स्वागत आहे. मात्र, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी बॉलीवूड तिकडे साकारणं शक्य नाही. केंद्र सरकारकडून सातत्याने मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्याचाच हा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.