(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ulhasnagar : नागरिकांचा पालिकेत कामासाठी हेलपाटा अन् मनपा अधिकारी, कर्मचारी जंगी पार्टीत व्यस्त...
उल्हासनगर मनपामध्ये अधिकारी आणि कर्मचारी कामकाजाच्या वेळी उपस्थित नव्हते. चौकशी केल्यानंतर ते पार्टी साजरी करत असल्याचं समोर आलं.
उल्हासनगर : आज उल्हासनगर मनपा मुख्यालयात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता, उन्हातान्हात कामकाजाच्या निमित्ताने मुख्यालयात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आज सुट्टी असल्याचे वाटले. मात्र याबाबत पत्रकारांनी चौकशी केली असता मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी टाऊन हॉलमध्ये कामकाजाच्या वेळेत पार्टी साजरी करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आज उल्हासनगर मनपा मुख्यालयात नेहमीप्रमाणे सर्वसामान्य नागरिक विविध कामानिमित्त मुख्यालयात येत होते. मात्र मुख्यालयातील बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. मनपा आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर हे मंत्रालयात एका महत्वपूर्ण बैठकीला गेले होते. तर उर्वरित जवळपास 80 ते 90 टक्के अधिकारी आणि कर्मचारी उल्हासनगर मधील टाऊन हॉलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत मग्न होते.
मालमत्ता विभागाचे अधिकारी राजेश घनघाव यांचा आज वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्यांनी मनपा कर्मचाऱ्यांनी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते . दुपारी 12 पासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती. या शिवाय आगामी महानगरपालिका पतपेढीची निवडणूक लक्षात घेऊन सरकारी कामकाजाच्या वेळेत ही पार्टी आयोजित करण्यात आली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.
आम्ही कागदपत्रे किंवा टॅक्स भरण्यास एक दिवस उशीर केला तर आम्हाला दंड आकारणी केली जाते, नको त्या चौकशांना सामोरे जावे लागते अशी तक्रार नागरिकांनी केली. आता मनपा अधिकारी आणि कर्मचारीच कामकाजाच्या वेळेत पार्ट्या करण्यात मग्न असतील तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली.
दरम्यान, मनपा उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी अधिकारी आणि कर्मचारी टाऊन हॉलमध्ये पार्टीसाठी गेल्याचे मान्य केले. मात्र याबाबत भाष्य करण्यास टाळले.
महत्त्वाच्या बातम्या: