Coronavirus | डहाणूमधील तीन वर्षीय चिमुकलीची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह
पालघरमधील आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे, कारण डहाणूमधील तीन वर्षीय चिमुकलीची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे
पालघर : पालघरमधील डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या तीन वर्षांच्या मुलीची कोरोना विषाणूची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे. पालघर आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.
पालघर तालुक्यातील काटाळे या ठिकाणी असलेल्या वीटभट्टीवर या चिमुकलीचे पालक काम करत होते. या मुलीमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आल्याने तिला प्रथम मासवण, नंतर कासा आणि पुढे डहाणूच्या कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. या चिमुकलीचा परदेशातून आलेल्या कोणाशीही थेट संपर्क आला नव्हता. तरीही कोरोनाचा संसर्ग झाल्याने स्थानिक पातळीवर तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.
या मुलीला कोरोनाची बाधा झाल्याने पालघर तालुक्यातील मासवण आणि काटाळे विभागातील 20, डहाणू तालुक्यातील सुमारे 40 तर विक्रमगड येथील सुमारे 15 व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
सध्या या मुलीच्या फेरतपासणीचा अहवाल नकारात्मक आल्याने आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, या संसर्गाच्या घटनेसंदर्भात इतर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पालघर आणि डहाणू परिसरात लादण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.