सोसायटीचे सेक्रेटरी, चेअरमन माजलेत, त्यांना आधी जेलमध्ये टाका : डॉ. जलिल पारकर
अनेक हाऊसिंग सोसायट्या सरकारचे नियम पायदळी तुडवत स्वत:चेच नियम बनवत आहेत. याच मुद्द्यावर डॉ. जलिल पारकर यांनी संताप व्यक्त केला. सोसायटीचे सेक्रेटरी, चेअरमन माजले आहेत, त्यांना आधी जेलमध्ये टाका, असं डॉ. जलिल पारकर म्हणाले.
मुंबई : "कोरोना संकटात पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव दिला आहे आणि पुष्कळ प्रयत्न करत आहेत. पण गृहनिर्माण सोसायटीमधील खुर्च्यांवर बसलेल्या सचिव किंवा अध्यक्षांना माज आलेला आहे. माझी पोलीस, मंत्री आणि सरकारला विनंती आहे की यांना आधी जेलमध्ये टाका," असा संताप मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जलिल पारकर यांनी व्यक्त केला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना पल्मॉनॉलॉजिस्ट डॉ. जलिल पारकर यांनाच कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर एबीपी माझाशी संवाद साधला. डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय दिवसरात्र काम करत आहेत, असं सांगून सरकारने खासगी रुग्णालयांच्या मागे लागू नये अशी विनंतही त्यांनी केली.
डॉ. जलिल पारकर हे मुंबईतील प्रसिद्ध पल्मॉनॉलॉजिस्ट आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार तसंच निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे डॉक्टर म्हणजे जलिल पारकर परिचित आहेत. कोविड योद्धे म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना त्यांना कोरोनाची लागण झाली. परंतु मोठ्या जिद्दीने त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.
पाच दिवस आयसीयूमध्ये होतो कोरोना झाल्यानंतर आणि त्यामधून बरं झाल्याचा अनुभव सांगता ना डॉ. जलिल पारकर म्हणाले की, "देवाची कृपा आणि लोकांच्या प्रार्थनेमुळे मी आणि आणि पत्नी जिवंत आहोत. मी पाच दिवस आयसीयूमध्ये होतो. मृत्यू काय असतो हे मी पाहिलं. 11 तारखेला अंगदुखीचा त्रास सुरु झाला. ताप, खोकला सर्दी नव्हता. कोविड रुग्णांवर आयसीयू आणि आयसोलेशनमध्ये रुग्णांवर उपचार करताना मी औषध घेण्याचा विचार केला. पाच दिवसांचा कोर्स पूर्ण केला. पण त्रास कमी झाला नाही. आयसीयूमध्ये अॅडमिट झालो. दुसऱ्या दिवशी माझ्या शेजारी बायको होती. बायकोला वाचवलं नाही तर मुलाला काय उत्तर देणार, म्हणून मी निश्चिय केला की बरं व्हायचं. इतर डॉक्टर माझ्यावर उपचार करत होते. हे पाच दिवस मी जे पाहिलं तशी वेळ कोणावर येऊ नये."
सरकारने खासगी रुग्णालयांच्या मागे चाबूक घेऊन लागू नये खासगी रुग्णालयं पैसे उकळत आहे, असं सांगून सरकार चाबूक घेऊन त्यांच्या मागे लागलं आहे, परंतु हे चुकीचं आहे. रुग्णालयांकडे पैसे नाहीत. कोण श्रीमंत, कोण गरीब, त्यांचा धर्म कोणता हे न पाहता डॉक्टर सगळ्यांवर उपचार करत आहेत. खासगी रुग्णालयं, कर्मचाऱ्यांच्या मागे लागू नका. पैसे नसूनही ते एवढं काम करत आहेत की शब्दात व्यक्त करु शकत नाही, असं डॉ. जलिल पारकर म्हणाले. "डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय कशाचीही तमा न बाळगता दिवसरात्र काम करत आहेत. त्यांना आपण प्रोत्साहन द्यायला हवं. त्यांच्या कामाचे तास एवढे आहेत की ते देखील आजारी पडतील अशी भीती आहे. सगळे थकले आहेत," असंही डॉ. पारकर यांनी सांगितलं. सोसायटीच्या सचिव, अध्यक्षांना जेलमध्ये टाका गृहनिर्माण संस्थांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर वाळीत टाकण्यासारखे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. शिवाय अनेक सोसायट्या सरकारचे नियम सर्रास पायदळी तुडवत स्वत:चेच नियम बनवत आहेत. यानुसार सोसायटीमध्ये बाहेरुन येणाऱ्या लोकांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु यामुळे वयोवृद्धांची मोठी अडचण होत आहे. याच मुद्द्यावर डॉ. जलिल पारकर यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव दिला आहे आणि पुष्कळ प्रयत्न करत आहे. मला एक गोष्ट खटकते आहे ती म्हणजे गृहनिर्माण सोसायटीमधील खुर्च्यांवर बसलेल्या सचिव किंवा अध्यक्षांना माज आलेला आहे. यांची काही भूमिका नाही. ते सरकारच्या आदेशाचं उल्लंघन करत आहेत. सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या वयोवृद्ध लोकांना मदतीची गरज आहे. पण त्यांना सोसायटीवाल्यांनी बंद करुन ठेवलं. तुम्हाला कोविड म्हणजे वाळीत टाकणारा आजार आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही मदत करायला हवी. माझी पोलीस, मंत्री आणि सरकारला विनंती आहे की या लोकांना माज आलेला आहे त्यांना आधी जेलमध्ये टाकावं. स्वत:ला काय समजतात? बसून मोठमोठ्या बाता करण्याव्यक्तिरिक्त हे लोक काहीच करत नाहीत. सोसायटी म्हणजे जबाबदारी आहे. आम्ही जीव दिलेला आहे, आम्ही परत जाऊ आणि पुन्हा जीव देऊ. तुमच्यासारखं बसून राहणार नाही. यांना मेड नको, दूधवाला, पाणीवाला, कोणालाच येऊ द्यायचं नाही. त्यामुळे या माज आलेल्या सोसायटीच्या सेक्रेटरी, चेअरमन यांना आधी जेलमध्ये टाका."