मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी देश आणि राज्याच्या तुलनेत कमी
केंद्रीय समितीने आपल्या निष्कर्षांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येचे विश्लेषण करून त्या आधारे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांचा मृत्यू दर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा कमी असल्याचे निरीक्षणही नोंदविले आहे.
मुंबई : 'कोरोना कोविड 19' या संसर्गजन्य आजाराने बाधित झालेल्या रुग्णांच्या वाढीचा वेग बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मंदावत असल्याचा निष्कर्ष केंद्र शासनाद्वारे नियुक्त समितीने काढल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. या निष्कर्षांनुसार 17 ते 27 एप्रिल दरम्यान रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांवर गेला आहे. जो यापूर्वी 8.3 दिवस असा होता.
देशाच्या पातळीवर रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी हा 9.5 दिवस एवढा आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर हा कालावधी 8.9 दिवस इतका आहे. केंद्रीय समितीने आपल्या निष्कर्षांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येचे विश्लेषण करून त्या आधारे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांचा मृत्यू दर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा कमी असल्याचे निरीक्षणही नोंदविले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर दर शंभर बाधित रुग्णांना मागे सरासरी 4.3 रुग्णांचा मृत्यू होत आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दर शंभर बाधित रुग्णांना मागे सरासरी 3.9 रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. काही दिवसांपूर्वी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांचा मृत्युदर सरासरी 6.3 टक्के एवढा होता.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 11 मार्चला पहिला रुग्ण सापडला. 26 एप्रिलपर्यंत तब्बल एक लाख 29 हजार 477 रूग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधण्यात आले. यातील 21 हजार 53 हे हाय रिस्क गटातील होते. यातून 1 हजार 647 रूग्ण शोधता आले.
देशभरातील वैद्यकीय चाचण्यांच्या आकडेवारीचे विचार करता देशभरात सर्वाधिक वैद्यकीय चाचण्या या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत तब्बल 66 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सहा हजार पार गेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत मुंबईत 244 जणांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :