Thane: पुल तयार झालेत पण सुरु करायला अडचण काय? कशाची प्रतीक्षा करताहेत? वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमच
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणेकरांच्या अपेक्षा थोड्या वाढल्या आहेत. या पुलांच्या उद्घाटनांसाठी प्रशासन मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांच्या दौऱ्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न पडला आहे.
Thane News : नागरिकांच्या हितासाठी असलेले हे सरकार नागरिकांना विसरले का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ठाण्यातील 2 मोठे पूल बांधून तयार असून त्यांच्या उद्घाटनाचा विसर प्रशासनाला पडलेला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. तसं बघायला गेलं तर ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर असा रुतबा मिरवतं. पण त्याच ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत होणारी नागरिकांची गैरसोय मात्र सरकार दरबारी पोहोचत नाही का असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे कारण देखील तसेच आहे.
मुंब्रा शहरातील अवजड वाहनांमुळे होणारे ट्राफिक जाम दूर करण्यासाठी हा पूल एमएमआरडीने बांधला खरा, पण 2017 पासून सुरू असलेले बांधकाम अजूनही संपले नसल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. मात्र या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
भारत गियर कंपनीजवळचा शिळ-मुंब्रा बायपास पुल अनेक दिवसांपासून तयार आहे. रोजच प्रवासी वाहतूक कोंडीत अडकतात, त्यामुळे जवळचाच मुहूर्त शोधून हा पुल रहदारीसाठी खुला करावा. आपणास वेळ नसेल तर आम्ही तयार आहोत, असं राजू पाटलांनी म्हटलं आहे.
भारत गियर कंपनीजवळचा शिळ-मुंब्रा बायपास पुल अनेक दिवसांपासून तयार आहे. रोजच प्रवासी वाहतूक कोंडीत अडकतात, त्यामुळे जवळचाच मुहूर्त शोधून हा पुल रहदारीसाठी खुला करावा. आपणास वेळ नसेल तर आम्ही तयार आहोत. @mieknathshinde @MMRDAOfficial @shambhurajdesai pic.twitter.com/cd7AUb16Zv
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) October 28, 2022
कळव्याच्या खाडी पुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मानलेली ही मार्गिका गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून अशीच धुळखात पडली आहे. याचे देखील एक ते दोन टक्के काम उरल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेने केलाय. मात्र हे काम पूर्ण झाले असून मुख्यमंत्र्यांना का वेळ मिळत नाही असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
ठाण्यात चार चाकी वाहनांनी प्रवास करणे म्हणजे एक अपराध असल्याचे सध्या नागरिकांना वाटत आहे. वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेले नागरिक हे पूर्ण झालेले प्रकल्प तरी उद्घाटन करून त्यांच लोकार्पण करावे अशी मागणी करत आहेत.
ठाणे शहरातील आणि ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीमुळे या आधी देखील वाहतूक पोलिसांना पालिकेला आणि सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले आहे. त्यात खुद्द एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणेकरांच्या अपेक्षा थोड्या वाढल्या आहेत. तरीही या दोन उद्घाटनांसाठी पालिका प्रशासन मुख्यमंत्री किंवा थेट पंतप्रधानांच्या प्रस्तावित दौऱ्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.