'दिव्या' खाली अंधारच! दुर्लक्षित दिवा शहराचा वाली कोण?
दिवा हे ठाणे महापालिकेचे तसे दुर्लक्षित क्षेत्र. इथे कोणत्याच सोयी सुविधा वेळेत पोहोचत नाहीत. तसेच काहीही समस्या असली तरी महापालिका, स्थानिक राजकीय नेते, नगरसेवक, आमदार, खासदार अशा कोणाचाच आधार या दिवावासियांना नसतो.
ठाणे : दिवा (Diva Thane)हे ठाणे महापालिकेचे (Thane Mahapalika) तसे दुर्लक्षित क्षेत्र. इथे कोणत्याच सोयी सुविधा वेळेत पोहोचत नाहीत. तसेच काहीही समस्या असली तरी महापालिका, स्थानिक राजकीय नेते, नगरसेवक, आमदार, खासदार अशा कोणाचाच आधार या दिवावासियांना नसतो. काल देखील असेच झाले. ठाणे शहरात प्रचंड पाऊस झाला, तिथे पाणी साचले, झाडे पडली, भिंती पडल्या याची दखल पालिका प्रशासन आणि राजकारणी लोकांनी ताबडतोब घेतली. मात्र याच ठाणे पालिकेचा भाग असलेल्या दिव्यात रस्ते पाण्याखाली होते, लोकांच्या घराघरात पाणी होते, प्रत्येक चाळीत, बिल्डिंगच्या आवारात, पाणी तुंबले होते मात्र कोणीही तिकडे फिरकले नाही.
दिवा प्रभागात नाले सफाई झाली असल्याचे फक्त कागदोपत्री दिसून येते मात्र प्रत्यक्षात तिथे काहीच काम झालेले नसते. त्यात दिवा आगासान रस्त्याचे अनेक महिन्यांपासून सुरू असलेले काम अजूनही संपलेले नाही. त्याचा मोठा फटका आजूबाजूच्या चाळीत, इमारतीत राहणाऱ्या लोकांना बसला. ठिकठिकाणी सुरू असलेल्या खोदकामामुळे नाले तुंबेलेल आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही आणि पाणी तुंबले. मात्र पालिका आयुक्त आणि महापौरांनी आज ठाण्यात नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. मदतीचे आश्वासन दिले. पण आयुक्त आणि महापौरांचा हा दौरा सुरू असतानाच दुसरीकडे दिव्यात नागरिक घरातील पाणी बाहेर काढत होते. आपले खराब झालेले सामान फेकून देत होते. काल दिवसभर पाण्यात गेल्याने आज लहान मुलांना जेवण करून खाऊ घालत होते. मात्र या परिस्थितीची जाणीव ठाण्यात बसलेल्या पालिका आयुक्तांना, अधिकाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना झाली नाही. त्यामुळेच तिकडे कोणी फिरकले देखील नाही.
गेल्या अनेक प्रशांत पासून दिवा प्रभागात केवळ लोकसंख्या वाढली आहे. मात्र त्या प्रमाणात सोयीसुविधांचा विकास येथे झालाच नाही. उन्हाळ्यात या परिसरात लोकांना पाणी मिळत नाही तर पावसाळ्यात घराघरात गटाराचे आणि नाल्याचे पाणी तुंबलेले बघायला मिळते. ठाणे महानगरपालिकेचा भाग असूनही दिवा दुसऱ्या टोकाला असल्याने तिथपर्यंत पालिका आयुक्त, महापौर तिचे कधीच जात नाहीत. दुसरीकडे दिवा हा प्रभाग डोंबिवलीतील विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे येथे निवडून आलेला आमदार व डोंबिवलीचा विकास करतो मात्र दिव्या कडे पाहत नाही. लोकसभा मतदारसंघात देखील दिवा हा प्रभाग कल्याण-डोंबिवली मतदारसंघातील असल्याने तो अगदीच टोकाचा भाग आहे. त्यामुळे खासदार देखील येथे फिरकत नाहीत. अशा परिस्थितीत स्थानिक नगरसेवक मनाला वाटेल तसे निर्णय घेऊन इथे विकास कामे करतात. मात्र या विकास कामांचा एकमेकांना ताळमेळ नसल्याने आजपर्यंत सुनियोजित विकास येथे झालाच नाही.