ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी... खारेगाव उड्डाणपूल डिसेंबरमध्ये सुरू होणार? वादामुळे झालाय विलंब
आताच्या घडीला या उड्डाणपुलाचे जवळजवळ सर्व काम झाले आहे. मात्र कंत्राटदार आणि ठाणे महानगरपालिकेच्या वादामुळे हा उड्डाणपूल सुरू करण्यात आलेला नाही.
ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कळवा येथील खारेगाव उड्डाणपूल डिसेंबरच्या पंधरा ते वीस तारखे दरम्यान कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यात येईल असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. या उड्डाणपुलाचे 95 टक्के बांधकाम होऊन देखील काही क्षुल्लक गोष्टींसाठी उड्डाणपूल खुला करण्यात येत नसल्याने काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेत या संदर्भात बैठक घेतली.
या बैठकीला ठाण्याचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के उपस्थित होते. बैठकीदरम्यान उर्वरित पाच टक्के कामे लवकरात लवकर पूर्ण करून 15 डिसेंबर पर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी तयार होईल असे सांगण्यात आले आहे. तसेच उड्डाणपुलाखाली असलेले रेल्वे फाटक देखील याच काळात बंद करून पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू करण्यात येईल असेही ठरवण्यात आले आहे. त्यामुळे खारेगाव येथील रेल्वे फाटक बंद झाल्यास पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.
कळवा येथील खारेगाव रेल्वे फाटकामुळे होत असलेला त्रास पाहून 2006 साली याठिकाणी 1 पूल बांधण्याचे ठरवले गेले. त्याला 2008 झाली ठाणे महानगरपालिकेने मंजूर घेऊन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर कळवा पूर्वेला आणि पश्चिमेला पूल ज्या ठिकाणी उतरवायचा होता, त्याजागी जमिनीचे अनेक वाद समोर आले, यातील मफतलाल कंपनीच्या जमिनीच्या वादामुळे सर्वात जास्त विलंब झाला. त्यामुळे प्रत्यक्षात हे काम 2015 साली पूर्ण झाले.
यातदेखील ठाणे महानगरपालिकेने अत्यंत दिरंगाई केल्याने अजूनही हे काम पूर्ण होऊ शकले नाही. आताच्या घडीला या उड्डाणपुलाचे जवळजवळ सर्व काम झाले आहे. मात्र कंत्राटदार आणि ठाणे महानगरपालिकेच्या वादामुळे हा उड्डाणपूल सुरू करण्यात आलेला नाही. ज्यावेळी हा उड्डाणपूल सुरू होईल, त्याच वेळी खारेगाव रेल्वे फाटक बंद करण्यात येईल आणि मध्य रेल्वेला त्यांच्या लोकल सेवा वेळेत सुरू ठेवता येतील. दुसरीकडे हे रेल्वे फाटक बंद झाल्यानंतरच पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे उर्वरीत काम देखील पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे खारेगाव उड्डाणपूल कधी सुरू होतो यावर अनेक प्रकल्प अवलंबून आहेत.