(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 50 चा आकडा देखील गाठता आला नाही.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीचा (Mahayuti) अभूतपूर्व विजय झाला आहे. राज्यभरातील 288 विधानसभा जागांपैकी महायुतीला 236 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. विधानसभेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीला 50 चा आकडा देखील गाठता आला नाही.
महाविकास आघाडीला केवळ 49 जागा जिंकता आल्या. यामध्ये ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाला मिळून 14 जागाच जिंकता आल्या. महाविकास आघाडीच्या या अपयशामुळे शरद पवार, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची पुढील राज्यसभा टर्म देखील मिळणार नाही. महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठी सामान्यपणे 43 चा कोटा निर्धारित होतो. त्यानूसार महाविकास आघाडी मिळून एक राज्यसभा सदस्य निवडून आणता येईल, (तेही एका नावावर सहमती झाल्यास) असं समोर आलं आहे. शरद पवारांच्या जागेवरही राष्ट्रवादीला राज्यसभेवर कुणाला पाठवता येणार नाही. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्रित मिळून एकच खासदार निवडून देता येईल.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार?
राज्यात विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक 28+1=29 सदस्यांची संख्या सध्या कोणत्याच विरोधी पक्षाकडे नाही.सत्ता स्थापन करताना एकत्रित येऊन संख्याबळ सादर कराव लागतं. मात्र पक्षनेता निवडताना किमान एका पक्षाकडे 29 सदस्य असणं गरजेच आहे. सध्या विरोधी पक्षातील कोणताच पक्ष अपेक्षित संख्याबळ गाठत नाही.
2014 आणि 2019 ला लोकसभेत आणि 2024 ला महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार?
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं स्वबळावर सत्ता मिळवली होती. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेली संख्या देखील पार करता आली नव्हती. संसदेत लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी 55 जागांची आवश्यकता असते. 2019 आणि 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला 55 जागा मिळाल्या नव्हत्या. महाराष्ट्रात देखील यावेळी तशीच स्थिती निर्माण होत असल्याचं दिसून येतं आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला 28 आमदारांचा टप्पा पार करता येत नसल्याचं चित्र आहे. मविआतील कोणत्याही पक्षाला जर 28 जागा मिळाल्या नाहीत तर पाच वर्ष महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नसणार आहे.