Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांनी आत्तापर्यंत आठवेळा निवडणूक लढवली होती, ते एकदाही हरले नव्हते. मात्र नवव्या वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला. संगमनेर विधानसभा मतदारसंघात (Sangamner Vidhan Sabha Election 2024) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आत्तापर्यंत आठवेळा निवडणूक लढवली होती, ते एकदाही हरले नव्हते. मात्र आता नवव्या वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून (Shirdi Vidhan Sabha Election 2024) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. यानंतर लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना टोला लगावलाय.
अहिल्यानगरची जनता ही महायुतीच्याच पाठीशी आहे हे विधानसभेच्या निकालाने सिध्द करुन दाखविले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून फक्त खोटे नॅरेटिव्ह पसरविण्याचे काम झाले. मात्र सुज्ञ जनतेने त्यांना थारा दिला नाही. जाणत्या राजांनीही या जिल्ह्यात खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही जनतेने घरात बसविले आहे तर भावी म्हणून मिरवून घेणाऱ्यांना सुध्दा जनतेने आता माजी करुन टाकले असल्याचा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. केवळ दिशाभूल करणारी वक्तव्ये करुन राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम लोकसभा निवडणुकीत यांनी केले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारमध्ये कुठेही घटना बदलली नाही आणि आरक्षणही रद्द केले नाही. जनतेने खोट्या नरेटिव्हला विधानसभा निवडणुकीत थारा दिला नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक असे पाठबळ देवून पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी दिली, असेही त्यांनी म्हटले.
विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणा
महायुतीच्या योजनांना बदनाम करण्याचे काम तसेच समाजामध्ये जातीयवादावरुन सामाजिक मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. या सर्वांनाच जनतेने मतदानातून चपराक दिली. या शिर्डी विधानसभा मतदार संघातही जाणते राजे आले. खोटे आरोप करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण शिर्डीच्या सुज्ञ जनतेने त्यांना कुठेही थारा दिला नाही. कारण वर्षानुवर्ष जिल्ह्यात एकमेकांमध्ये झुंजी लावण्याचे काम त्यांनी केले. कुटूंबा कुटूंबामध्ये भांडणे लावली. या जिल्ह्याचा केवळ राजकारणासाठी वापर करुन घेतला. चार वेळा मुख्यमंत्री राहनही निळवंडेचे काम यांना पूर्ण करता आले नाही. त्यांच्याही खोट्या भूलथापांना आता जनतेने टोलावले आहे. आता जिल्ह्यातच काय राज्यातही त्यांना फिरण्याची संधी राहिलेली नाही. त्यांनी आता घरात बसून आराम करावा, असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला.
भावींना आता जनतेने माजी करुन टाकलं
राज्यात अनेक भावी मुख्यमंत्री तयार झाले होते. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातीलही एक होते. पण या भावींना आता जनतेने माजी करुन टाकले आहे. दहशतीचा आरोप करुन शिर्डीच्या पवित्र भूमीला आणि जनतेला अपमानीत करण्याचे काम शेजारच्या नेत्यांनी केले. पण खरी दहशत कुठे होती हे उघड झाले. संगमनेरच्या दहशतीचे झाकण आता खऱ्या अर्थाने उडाले आहे. अमोल खताळ सारख्या सामान्य कार्यकर्त्याने यांची दहशत मोडून काढली असल्याचे सांगतानाच पारनेरच्या बाबतीतही हेच घडले. केवळ विखे परिवाराची बदनामी करुन राजकारण करू पाहणाऱ्यांना आता या जिल्ह्याने चांगलाच धडा शिकविला आहे, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला.
जनतेने पाठबळामुळेच ऐतिहासिक विजय
महायुतीचे दहा आमदार निवडून आल्यामुळे हा जिल्हा महायुतीच्या पाठीशीच आहे हे सिध्द झाले आहे. येणाऱ्या काळात जी जी आश्वासने महायुती सरकारच्यावतीने देण्यात आली आहेत. त्याची पूर्तता करतानाच शिर्डीची औद्योगिक वसाहत, निळवंडे चाऱ्यांची कामे आणि युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचे काम पुढील एक वर्षात आपल्याला करायचे आहे. शिर्डीच्या जनतेने दिलेल्या पाठबळामुळेच हा ऐतिहासिक विजय होवू शकला. लाडक्या बहिणींचे पाठबळ उभे राहिल्याचे समाधान विखे पाटील यांनी व्यक्त केले.
आणखी वाचा
विधानसभा झाली! आता लवकरच महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता