एक्स्प्लोर
Thane Rain | ठाण्यात पावसाने दाणादाण, झाडे पडली, भिंती कोसळल्या
हवामान विभागाच्या अंदाजला खरे ठरवत गुरूवारपासून ठाण्यात मुसळधार पाऊस बरसतो आहे. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या दुर्घटना झाल्या तर काही ठिकाणी भिंती देखील पडल्या आहेत. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.
ठाणे : ठाण्यात काल दिवसभर मुसळधार पावसाने थैमान घातले. सुरुवातीला रिमझिम पडणाऱ्या पावसाने काल अकराच्या सुमारास जोर धरला. त्यानंतर रात्रीपर्यंत संपूर्ण शहरात मुसळधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने तब्बल 189 मिमी पावसाची नोंद केली. यावर्षीचा मोसमातील सर्वाधिक पाऊस आजच्या दिवशी झाल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे दिवस भरातील मुसळधार पावसाने ठाण्यात 12 ठिकाणी पाणी साचले आणि तीन ठिकाणी झाडे कोसळण्याच्या दुर्घटना झाल्या. यासोबत काही ठिकाणी भिंती देखील पडल्या. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.
हवामान विभागाच्या अंदाजला खरे ठरवत गुरूवारपासून ठाण्यात मुसळधार पाऊस बरसतो आहे. शुक्रवारी देखील सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर दुपारी त्याच पावसाने मुसळधार बरसायला सुरुवात केली. शुक्रवारी ठाण्यात 189 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद केलेली असून आतापर्यंत ठाणे शहरात एकूण 622.33 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत 1107.26 मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली होती. सातत्याने मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यात खटले गार्डन मागची 12 फुटाची भिंत कोसळली. तर ठाण्याच्या चंदनवाडी शिव दर्शन सोसायटी समोरची जांभुलकर चाळीची 25 ते 30 फुटाची संरक्षक भिंत पडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही मात्र येथील घरांचे मोठे नुकसान झाले. तर ठाण्यात दगडी शाळा, चरई परिसरात रस्त्यावर झाड कोसळले. तर खारकर आळी, अष्टविनायक चौक तसेच तुर्फेपाडा येथे घरांवर झाड पडल्याच्या तीन घटना घडल्या. ह्यासोबत इतर पाच लहान-मोठ्या तक्रारी आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.
ठाण्यात दिवसभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे 12 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. यात ठाण्याच्या गोकुळ नगर, युनायटेड हॉटेल्स जवळील वर्धमान इंडस्ट्रीज मध्ये पाणी शिरले आणि जमा झाले. माजीवडा सर्व्हिस रोड, ए-2 बिल्डिंग ऋतुपार्क येथे पाणी जमले होते. ठाणे गुन्हे शाखा कार्यालय, उर्जिता हॉटेल्स, जुने आरटीओ कार्यालयात पाणीच पाणी झाल्याची घटना घडली. वंदना सिनेमाच्या रस्त्यावर सालाबादप्रमाणे यंदाही पाण्याने नागरिकांचा चक्का जाम केला. तर याच ठिकाणी असलेल्या विद्युत पोलची वीज पाण्यात उतरल्याची घटना घडली मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले आणि अनर्थ टळला. लॉकडाऊन असल्यामुळे ठाण्यातील रस्त्यांवर सध्या नागरिक नाहीत मात्र अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना आजच्या मुसळधार पावसामुळे नक्कीच त्रास झाला. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने अचानकपणे हजेरी लावल्याने ठाणेकर सुखावले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement