ठाणे स्थानकात नवे रेल्वे ट्रॅक लागले, फक्त सिमेंट सुकण्याचा अवकाश; रेल्वेचा जम्बोब्लॉक ठरलेल्या वेळेपूर्वीच संपणार
सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील 36 तासांचा मेगाब्लॉक रविवारी दुपारी 12.30 वाजता तर ठाणे येथील 63 तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी 3.30 वाजता संपणार आहे.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील 36 तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी 12.30 वाजता तर ठाणे येथील 63 तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी 3.30 वाजता संपणार आहे. सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे रविवारीही लोकल भायखळा, परळ, दादर आणि वडाळ्यापर्यंत धावणार आहेत. त्यामुळे रविवारीदेखील प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्लॉकची ही वेळ लक्षात घेऊनच नागरिकांनी घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे.
31 लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द
सीएसएमटी स्थानकात शुक्रवार रात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आल्याने सर्व लोकल या परेल आणि भायखळा स्थानकापर्यंत धावत आहेत. तसेच हार्बर लाईनवर केवळ वडाळा स्थानकापर्यंतच लोकल धावत आहेत. आज रविवारी 235 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 31 लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा काही प्रमाणात फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या पनवेल कल्याण आणि ठाणे स्थानकात रद्द करण्यात आल्या आहेत.
मेगाब्लॉकचे 80 ते 90 टक्के काम पूर्ण
गुरुवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात जम्बो मेगाब्लॉक सुरू करण्यात आला आहे, आता या मेगाब्लॉकचे 80 ते 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक सुरू असणार आहे. मात्र रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या वेगवान कामामुळे हे काम वेळे आधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. या घडीला ट्रॅक बाजूला सरकवणे, ओव्हरहेड वायर यंत्रणा उभी करणे, सिग्नलिंग यंत्रणा उभी करणे, पॉइंट्स तयार करणे, क्रॉस ओव्हर तयार करणे अशी महत्त्वाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे देखील काम जवळपास पूर्ण झाले असून शेवटच्या टप्प्यातील सिमेंटिंग करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे वेळे आधीच हा ब्लॉक पूर्ण होऊन या प्लॅटफॉर्मवरून प्रवास सुरू करण्यात येईल.
2 जून रोजी कोणत्या अप रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय
दोन जून रोजी मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, जालना-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दोन जून रोजी काही डाऊन गाड्यादेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये सीएसएमटी -मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी -नांदेड तपोवन, सीएसएमटी -मडगाव तेजस एक्स्प्रेस, सीएसएमटी -शिर्डी वंदे भारत, सीएसएमटी -पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी -पुणे डेक्कन, सीएसएमटी -धुळे एक्स्प्रेस, सीएसएमटी -जालना जनशताब्दी या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :
'गुलाल आपलाच' म्हणत बारामतीत पोस्टर वॉर! सुप्रिया सुळेंनंतर आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर्स