(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tesla in India | टेस्लाची महाराष्ट्राऐवजी कर्नाटकला पसंती, बंगळुरुत नोंदणी; मनसेची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका
इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी 'टेस्ला'ने भारतात एन्ट्री करत कर्नाटकातील बंगळुरुमध्ये नोंदणी केली. टेस्लाने महाराष्ट्रात यावं यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्नशील होते. यासंदर्भात प्राथमिक चर्चाही झाली होती. परंतु टेस्लाने महाराष्ट्रऐवजी कर्नाटकला पसंती दिल्यानंतर मनसेने आदित्य ठाकरेंवर खोचक शब्दात टीका केली आहे.
मुंबई : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी 'टेस्ला'ची भारतात एन्ट्री झाली आहे. कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केली आहे. कंपनी इथे लक्झरी इलेक्ट्रिक कारची निर्मिती आणि व्यवसाय करणार आहे. बंगळुरुतील एका रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटसह कंपनी आपल्या कामाला सुरुवात करणार आहे.
पेज-3 मंत्र्यांना झटका : संदीप देशपांडे महत्त्वाचं म्हणजे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी टेस्लाच्या टीमसोबत 22 ऑक्टोबर 2020 रोजी प्राथमिक चर्चाही केली होती. यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली होती. परंतु टेस्लाने महाराष्ट्रऐवजी कर्नाटकला पसंती देत बंगळुरुमध्ये नोंदणी केली. त्यानंतर आता मनसेने आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज 3 मंत्र्यांना झटका. बोलाची कढी बोलाचा भात," अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली.
टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला पेज 3 मंत्र्यांना झटका" बोलाची कढी बोलाचा भात" pic.twitter.com/tvtD9CJLXT
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 13, 2021
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी टेस्लाचं स्वागत केलं आहे. टेस्लाची 8 जानेवारी 2021 रोजी बंगळुरुमध्ये नोंदणी झाली आहे. याचा नोंदणी क्रमांक 142975 आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेविड जॉन फेन्स्टीन कंपनीचे संचालक आहेत. वैभव तनेजा टेस्लामध्ये CFO आहेत, तर फेन्स्टीन टेस्लामध्ये ग्लोबल सीनियर डायरेक्टर, ट्रेड मार्केट अॅक्सेस आहेत. कंपनी भारतात मॉडल 3 लॉन्च करण्याची शक्यता आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस डिलिव्हरीला सुरुवात होऊ शकते
मस्क यांची ट्विटरवर घोषणा टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातील ट्वीटमध्य म्हटलं होतं की, कंपनी 2021 मध्ये भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. मस्क यांनी एका ट्वीटला दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की, निश्चितपणे आमची कंपनी पुढील वर्षात भारतात प्रवेश करेल.
नितीन गडकरी यांच्याकडूनही दुजोरा तर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2020 मध्ये याला दुजोरा देताना म्हटलं होतं की, टेस्ला पुढील वर्षी भारतात आपला उद्योग सुरु करेल. गडकरी म्हणाले होते की, "अमेरिकेतील ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी टेस्ला पुढील वर्षी भारतात आपल्या कारच्या वितरणासाठी केंद्र सुरु करणार आहे. मागणीच्या आधारावर कंपनी इथे वाहन निर्मितीचा कारखाना सुरु करण्याबाबत विचार करेल. पुढील पाच वर्षात जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहन उत्पादक बनण्याची क्षमता भारतात आहे.
2020मध्ये टेस्लाची विक्री 36 टक्क्यांनी वाढली 2020 मध्ये टेस्लाच्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र पाच लाख वाहनांच्या डिलिव्हरीचं वार्षिक लक्ष्य कंपनीला पूर्ण करता आलं नाही. कंपनीने आपल्या अहवालात म्हटलं होतं की, आम्ही 2020 मध्ये 4 लाख 99 हजार 500 वाहनांची डिलिव्हरी केली. यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान 1लाख 80 हजार 570 स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेईकल (एसयूवी) आणि सेडानच्या डिलिव्हरीचा समावेश आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी कोरोनाव्हायरसमुळे आलेली महामारी सुरु होण्यापूर्वी 2020 मध्ये पाच लाख वाहनांच्या डिलिव्हरीचं लक्ष्य ठेवलं होतं.
सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा आनंद काही दिवसच टिकला! दरम्यान इलॉन मस्क काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. एकाच दिवसात त्यांच्या मालमत्तेत सुमारे 14 अब्ज अमेरिकन डॉलरची घसरण झाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर घसरले. इलेक्ट्रिक वाहनं बनवणाऱ्या टेस्ला कंपनीचे सीईओ आता जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. अॅमेझॉनचे संस्थापत जेफ बेजॉस यांनी पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. फोर्ब्स मॅगझिननुसार, सोमवारी (11 जानेवारी) टेस्लाच्या शेअर्स सुमारे आठ टक्क्यांनी घसरले. त्यामुळेच मस्क यांची एकूण संपत्ती घसरण होऊन 176.2 अब्ज अमेरिकन डॉलर राहिली आहे.