मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलसह महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी
Terrorists Targets Mumbai Local : मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा धक्कादायक खुलासा चौकशीतून झाला आहे. मुंबई लोकल आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांची दहशतवाद्यांनी रेकी केली होती.
Terrorists Targets Mumbai Local : दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. मुंबई लोकल पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. असी धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच घातपाताचा कट यशस्वी करण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाची ठिकाणंही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा कट यशस्वी करण्यासाठी अनेक ठिकाणी विस्फोटकं पोहोचवण्यात आली आहेत, असं दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.
दिल्ली पोलिसांनी ज्या सहा दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी सुरु आहेत. चौकशी दरम्यान, एका दहशतवाद्यानं सांगितलं की, आम्ही मुंबई लोकलची संपूर्ण रेकी केली होती. यापूर्वी मुंबई लोकल अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. मुंबई लोकलमध्ये यापूर्वी सीरिअल बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी स्फोटकं लपवली आहेत. त्यापैकी काही स्फोटकं तपासयंत्रणांनी हस्तगत केली आहेत. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी मुंबईत वास्तव्यास होता. मुंबईतील सायन परिसरात जान मोहम्मद अली शेख हा वास्तव्यास होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुली असे चौघेजण धारावीतील घरात राहत होते. जान मोहम्मद हा पेशानं ड्रायव्हर होता. त्यामुळे मुंबईची रेकी करण्याची जबाबदारी जान मोहम्मदवर होती का? नेमका या कटात त्याचा कितपत सहभागी होता? याबाबत सध्या तपास सुरु आहे.
समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, जान महोम्मद अली शेख आणि त्याच्या साथीदारांना दाऊद इब्राहिमकडून रसद पुरवली जात होती. त्यामुळे जान महोम्मदचे आणखी कुणी साथीदार आहेत का? त्यांचा नेमका मनसुबा काय आहे? याचा छडा लावण्याचं तपास यंत्रणेसमोर आव्हान आहे.
कोण आहे जान मोहम्मद अली शेख?
जान मोहम्मद अली शेख सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. सायन येथील तो फार जुना रहिवाशी आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुली असे चौघेजण या घरात राहत होते. मुंबईच्या धारावीमध्ये जान मोहम्मदच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, जान मोहम्मदनं तीन दिवसांपूर्वी आमच्यासोबत चहा घेतला. तो स्वभावानं चांगला होता. ड्रायव्हर म्हणून काम करत होता. जान मोहम्मद धारावी परिसरात बऱ्याच वर्षांपासून राहत होता. जान महोम्मद दहशदवादी कटात सहभागी होता, या बातमीनं त्याच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच त्याचा स्वभाव अत्यंत साधा होता म्हणून, तो दहशतवादी कटात सहभागी असेल, असा संशयही कधी आला नाही.
पाहा व्हिडीओ : दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलसह राज्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी
भारतात स्फोट घडवण्याचा तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना अटक
दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचं लक्ष्य गर्दीची ठिकाणं आहेत.
स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुमार कुशवाह म्हणाले की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान सपोर्टेड दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. दोघांनी पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद्यांकडून स्फोटके आणि शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :